तडजोड, फोडाफोडी, मनधरणीचे राजकारण शिगेला

By Admin | Updated: September 10, 2014 02:14 IST2014-09-10T01:47:27+5:302014-09-10T02:14:19+5:30

महापौरांची आज निवडणूक, राजकीय पक्षांच्या बैठका

Shigella, compromise, insult politics | तडजोड, फोडाफोडी, मनधरणीचे राजकारण शिगेला

तडजोड, फोडाफोडी, मनधरणीचे राजकारण शिगेला

अकोला : महापौर पदाच्या निवडणुकीत बहुमताचे गणित जुळवून आणण्यासाठी राजकीय पक्षांच्या बैठकांना ऊत आला आहे. अपक्षांची मनधरणी, तडजोड व फोडाफोडीचे राजकारण शिगेला पोहचले आहे. सत्ताधारी काँग्रेस आघाडीसह विरोधी पक्ष भाजप-शिवसेनेकडे अपवाद एक अपक्ष नगरसेवक वगळता समान संख्याबळ असल्याने बुधवारी सभागृहात कोण बाजी मारणार हे प्रत्यक्ष सभागृहातच ठरेल.
महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी सत्ताधारी काँग्रेससह विरोधी पक्ष भाजपने बाह्या वर खोचल्या आहेत. काँग्रेसप्रणीत आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बमसं व अपक्ष नगरसेवकांचा समावेश असून, आघाडीचे संख्याबळ ३७ वर आहे. भाजप्रणीत महानगर सुधार समितीमध्ये अनेक अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे. नगरसेवकांची समान संख्या भाजप-शिवसेनेकडे असून, अपक्ष नगरसेवक गोपी ठाकरे तटस्थ आहेत. अडीच वर्षांंच्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून, काँग्रेस आघाडी व विरोधी पक्षातील सुमारे दहा अपक्ष नगरसेवकांनी एकत्र येऊन मोट बांधल्याचे चित्र आहे. महापौर, उपमहापौरपदाच्या इच्छुकांमध्ये आपसात घमासान रंगण्यासोबतच अपक्ष नगरसेवकांच्या आर्थिक हिशेबावर राजकीय पक्षांमध्ये प्रचंड माथापच्ची सुरू आहे.

** निर्णय अधांतरीच; सकाळी पुन्हा बैठक
काँग्रेसच्यावतीने पक्ष निरीक्षक जिया पटेल यांनी मंगळवारी रात्री सर्व १८ नगरसेवकांसोबत बैठकीत सविस्तर चर्चा केली. यामध्ये पाच इच्छुक नगरसेविकांपैकी कोणतेही एक नाव निश्‍चित होण्याची अपेक्षा होती. तसे न झाल्याने पाचही इच्छुकांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष १0 सप्टेंबर रोजी सकाळी अंतिम निर्णय घेतील. भाजप-शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली असता, बुधवारी सकाळी सात वाजता पुन्हा गटनेत्यांसोबत अंतिम चर्चा केली जाणार आहे. भारिपचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर बुधवारी सकाळी पक्षाची रणनीती स्पष्ट करणार आहेत.

** अपक्ष नगरसेवकांचे तळ्य़ात मळ्य़ात
सत्ता स्थापन करतेवेळी धर्मनिरपेक्ष पक्षाला पसंती देत अनेक अपक्ष नगरसेवकांनी काँग्रेस आघाडीत प्रवेश घेतला, तर काँग्रेस विरोधी अपक्ष नगरसेवक भाजपप्रणित महानगर सुधार समितीत दाखल झाले. अडीच वर्षांंच्या कालावधीत सत्तापक्षावर प्रचंड तोंडसुख घेणारे तसेच वेळप्रसंगी नागपूर हायकोर्टात याचिका दाखल क रणार्‍या विरोधी पक्षातील अपक्ष नगरसेवकांचा महापौरपदाच्या निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न टीकेचा विषय ठरत आहे.

** दर घसरले; १0 ते १२ लाखांवर माथापच्ची
काँग्रेस आघाडीसह विरोधी पक्षातील अपक्ष नगरसेवकांनी एकत्र येत मोट बांधली. महापौर पदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी आर्थिक बोलणी अंतिम टप्प्यात असून, तशी बैठक ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सत्तापक्षातील एका राजकीय पदाधिकार्‍यासोबत पार पडली. यामध्ये ५0 लाखांचे दर घसरून थेट १0 ते १२ लाखांवर येऊन ठेपले.

Web Title: Shigella, compromise, insult politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.