शर्व पाटील प्रथम; मुस्कान खेतान मुलींमध्ये अव्वल

By Admin | Updated: May 31, 2017 01:58 IST2017-05-31T01:58:33+5:302017-05-31T01:58:33+5:30

अकोला जिल्ह्याचा निकाल ८९.८१ टक्के : विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक

Sharav Patil first; Smile Khaitan is among the top girls | शर्व पाटील प्रथम; मुस्कान खेतान मुलींमध्ये अव्वल

शर्व पाटील प्रथम; मुस्कान खेतान मुलींमध्ये अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा मुलगा शर्व पाटील याने दोन वर्षांपूर्वी दहावीच्या परीक्षेत राज्यातून दुसरा येण्याचा मान पटकावला होता. यंदाच्या बारावीच्या परीक्षेतसुद्धा ९५.८५ टक्के गुण मिळवून यशात सातत्य कायम राखले आहे. सर्वाधिक गुण मिळवून शर्व पाटील याने महाविद्यालयातून प्रथम स्थान प्राप्त केले. वृत्त लिहेस्तोवर लोकमतकडे प्राप्त माहितीनुसार डवले कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी शर्व पाटील हा जिल्ह्यातून प्रथम असून आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाचा आशुतोष मसगर ९५.३८ गुण मिळवित द्वितीय तर आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची मुस्कान खेतान ९५.२३ गुण घेऊन जिल्ह्यात तिसरी तसेच मुलींमध्ये प्रथम आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ३० मे राजी घोषित करण्यात आला असून, अकोला जिल्ह्याचा ८९.८१ टक्के आहे. यावर्षीही जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली आहे.
जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी २६ हजार ९७८ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २६ हजार ९६१ विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेला बसले होते. यापैकी २४ हजार २१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ८९.८१ अशी आहे. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ३०३५ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, ९,३१५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ११,१९६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत. उत्तीर्ण २४ हजार २१५ विद्यार्थ्यांमध्ये १२,७१९ मुले व ११,४९६ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८७.०१ तर मुलींची टक्केवारी ९३.१४ अशी आहे.
मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९७.३२ टक्के, कला शाखेचा ८२.३६ टक्के, वाणिज्य शाखेचा ९५.०९ टक्के तर व्होकेशनल शाखेचा ८३.४० टक्के लागला आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक निकाल अकोला व अक ोट तालुक्याचा अनुक्रमे ९२.०७ टक्के लागला आहे. त्याखालोखाल तेल्हारा तालुका ९०.४६ टक्के, पातूर तालुका ८६.५४ टक्के, मूर्तिजापूर तालुका ८६.९६ टक्के, बार्शीटाकळी तालुका ८६.३९ टक्के तर बाळापूर तालुक्याचा सर्वात कमी ८६.३४ टक्के निकाल लागला आहे.

८० महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के
जिल्ह्यातील ८० कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये सर्वाधिक अकोला तालुक्यातील ४२ कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे, तर अकोट तालुक्यातील १२ , तेल्हाऱ्यातील ७, बार्शीटाकळीतील ६, बाळापुरातील ६, पातुरातील २ आणि मूर्तिजापूर तालुक्यातील ४ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. जिल्ह्यातील १२ महाविद्यालयांचा निकाल ९९ टक्यांपेक्षा जास्त लागला आहे.

पालकमंत्र्यांच्या मुलाचे दहावीसोबतच बारावी परीक्षेत सातत्य!
अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे गृह, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा मुलगा शर्व पाटील याने यंदाच्या बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. त्याच्या परीक्षेदरम्यान घरामध्ये वडिलांच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची धामधुम सुरू होती. सातत्याने कार्यकर्त्यांची वर्दळ घरी राहायची; परंतु शर्व याने आपले लक्ष विचलित न होऊ देता, अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. दोन वर्षांपूर्वी शर्व याने दहावीच्या परीक्षेतसुद्धा घवघवीत यश संपादन करून राज्यातून दुसरा क्रमांक पटकावला होता. शर्व याला वडील डॉ. रणजित पाटील, आई डॉ. अपर्णा पाटील यांच्यासारखेच वैद्यकीय क्षेत्रात करियर घडवायचे.
सोबतच त्याला राजकारणाचीसुद्धा आवड असून, वडिलांप्रमाणेच राजकारणात उतरून समाजसेवा करायची, अशी शर्व पाटील याची इच्छा आहे. शर्व सध्या आई-वडिलांसोबत मुंबईत आहे. मुलाच्या यशाची बातमी कळताच पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंत्रालयातून शासकीय निवासस्थान गाठले. यावेळी डॉ. रणजित पाटील, डॉ. अपर्णा पाटील यांनी त्याला पेढा भरवून त्याचे कौतुक केले. शर्व याला आई डॉ.अपर्णा पाटील यांच्यासोबतच डवले कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश डवले यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

Web Title: Sharav Patil first; Smile Khaitan is among the top girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.