लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विविध शैक्षणिक बाबींमध्ये प्रचंड घोळ केल्याप्रकरणी पिंजर येथील शामकी माता मराठी प्राथमिक शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुनाचे प्रा. मधुकर पवार यांना दुसऱ्यांदा नोटिस बजावली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशीमध्येच मोठा घोळ उघड झाल्याने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.गेल्या दोन-तीन वर्षात पिंजर येथील शामकी माता मराठी प्राथमिक शाळेतील प्रचंड घोळाच्या तक्रारी सातत्याने करण्यात आल्या. त्याबाबतची चौकशी उपशिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी जुलै २०१५ मध्येच केली होती. त्यानंतरही कारवाई न झाल्याने तक्रारकर्ते तारासिंग उकाराम राठोड, प्रवीण चव्हाण यांनी एप्रिल २०१९ मध्ये आत्मदहनाचा इशाराही दिला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी पुन्हा केलेल्या चौकशीचा अहवाल २४ एप्रिल २०१७ रोजी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. त्यावरून शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी २७ एप्रिल रोजी शामकी माता प्राथमिक मराठी शाळेची मान्यता रद्द करण्याची पहिली नोटिस बजावली. त्यानंतर प्रतिभा शिक्षण संस्थेचे प्रा. मधुकर पवार यांच्याकडून कोणतेच स्पष्टीकरण शिक्षण विभागाला प्राप्त झाले नाही. त्यामुळे दोन दिवसांआधी शिक्षणाधिकाऱ्यांनी पुन्हा नोटिस बजावली. त्यावर संस्थेचे स्पष्टीकरण सादर करण्यात आले. त्यानुसार पुढील कार्यवाहीसाठीचा प्रस्ताव शिक्षण विभागात तयार आहे. शिक्षणाधिकारी दिग्रसकर दौऱ्यावर असल्याने त्या प्रस्तावावर उद्या मंगळवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.चौकशी अहवालातून पुढे आलेला घोळपद रिक्त नसताना शासन नियमांची पायमल्ली करून प्रवीण गणेश चव्हाण यांची संस्था सचिव किसन पवार यांनी नियमबाह्यपणे केलेली नियुक्ती, शाळेत अनुपस्थित असताना शिक्षक डी.के. गिऱ्हे यांना सेवेतून कमी न करता केवळ डी.एड. पूर्ण करण्यासाठी ठेवले, आरटीई अॅक्टनुसार शाळेत किमान भौतिक सुविधाही उपलब्ध नाहीत. पी.सी. राठोड यांनाही डी.एड. करण्यापुरते सेवेत ठेवून काढून टाकले. त्यांची नियुक्ती अन्यायकारकपणे रद्द करून त्यांच्या जागेवर छाया पवार यांना नियुक्ती देण्यात आली. कामकाजाचे दस्तऐवज अद्ययावत नाहीत. वैयक्तिक न्यायालयीन प्रकरणात उपस्थित राहण्यासाठी रजा न टाकता हजेरीपुस्तकात त्याबाबत न्यायालयीन प्रकरण अशी नोंद करणे, २०१२-१३ ते २०१५-१६ पर्यंतच्या दाखल खारिजमध्ये प्रवेश घेणे, रद्द करणे यावरून विद्यार्थी प्रवेश खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे. शाळेतील चारही शिक्षकांमध्ये सातत्याने वाद असल्याने संस्थेतील कामकाज सुरळीत न ठेवणे, यासोबतच मूळ दस्तावेज बदलणे, खोटे विद्यार्थी प्रवेश दाखवणे, नियमित शिक्षकांचे वेतन न काढणे, आॅनलाइन माहिती खोटी दाखल करणे, शिक्षकांचा मानसिक, शारिरीक छळ करणे, अपमानास्पद वागणूक देणे, खंडणीची मागणी करणे, या बाबी पाहता शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे.
शामकी माता शाळेची मान्यता रद्द होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 01:22 IST