कु-हाडीच्या हल्ल्यात गंभीर जखमी आजीचाही अखेर मृत्यू
By Admin | Updated: April 21, 2015 00:41 IST2015-04-21T00:41:28+5:302015-04-21T00:41:28+5:30
आशाबाईने दिली तब्बल १८ दिवस मृत्यूशी झुंज.

कु-हाडीच्या हल्ल्यात गंभीर जखमी आजीचाही अखेर मृत्यू
अकोला: घरातून हाकलून दिल्याच्या रागातून नातवाने आजी व आजोबावर कुर्हाडीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना ५ एप्रिल रोजी घडली होती. हल्ल्यातील जखमी आजोबा गोविंदा मोरे (७0) यांचा जागीच मृत्यू झाला, तर आजी आशाबाई मोरे (६0) ही गंभीर जखमी असल्याने तिला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले होते. आशाबाईने तब्बल १८ दिवस मृत्यूशी झुंज दिली. अखेर सोमवारी खासगी रुग्णालयात तिचाही मृत्यू झाला. आजी, आजोबावर हल्ला करणारा आरोपी सचिन वाल्मीक खंडारे याला घटनेच्या दिवशीच डाबकी रोड पोलिसांनी अटक केली होती. आरोपी खंडारे हा सध्या कारागृहात आहे. अमानतपूर येथील मृतक गोविंदा मोरे यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीसह मुलगी व तिच्या मुलाला अध्र्या घरामध्ये आसरा दिला होता; परंतु नातू सचिन खंडारेच्या त्रासाला कंटाळून त्यांनी त्याला, मुलीला व पत्नीला घराबाहेर हाकलले. आजोबाने घरातून हाकल्याचे शल्य आरोपी सचिन खंडारेच्या मनात खदखदत होते. यातूनच त्याने ५ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वृद्ध आजी-आजोबांवर प्राणघातक हल्ला केला. यात आजोबा गोविंदा मोरे जागीच ठार झाले. आजी आशाबाई मोरे ही जखमी झाल्याने तिला पोलिसांनी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले; परंतु तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी तिच्यावर १८ दिवस उपचार सुरू होते. डॉक्टर तिला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते; परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. सोमवारी दुपारी आशाबाईचा मृत्यू झाला.