पिंजरा तोडून वाघाने केल्या सत्तर कोंबड्या फस्त
By Admin | Updated: March 10, 2015 01:48 IST2015-03-10T01:48:53+5:302015-03-10T01:48:53+5:30
मालेगाव तालुक्यातील रेगावात वाघाची दहशत; वनविभागाने केला पंचनामा.

पिंजरा तोडून वाघाने केल्या सत्तर कोंबड्या फस्त
मालेगाव (वाशिम): तालुक्यातील रेगाव येथील एका शेतकर्याच्या शेतातील सुमारे ७0 कोंबड्या वाघाने फस्त केल्याची घटना ६ मार्च रोजी घडली. रविवारी वनविभागाने केलेल्या पंचनाम्यात वाघाचे ठसे व केस आढळून आले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. रेगाव येथे किशोर कांबळे व ज्ञानदेव लठाड यांनी कृषी समृध्दी प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येकी ५0 कोंबड्यासाठी पिंजरा केला होता. यामध्ये १00 कोंबड्या ठेवण्यात येत होत्या. ६ मार्च रोजी वाघ शेतामध्ये आला. त्याने या कोंबड्याचा पिंजरा तोडण्याचा सर्व बाजूंनी प्रयत्न केला. पिंर्जयाची एक बाजू तोडल्यानंतर वाघाने पिंजर्यातील ७0 कोंबडया फस्त केल्या. वाघाच्या डरकाळीने जागलीवर असलेले शेतातील शेतकरी जीव मुठीत घेवून लपून बसले होते. कोंबड्यावर ताव मारल्यानंतर वाघ निघून गेला. यानंतर पहाटे काही शेतकर्यांनी कांबळे यांच्या शेतात धाव घेतली. त्यावेळी त्यांना सर्वत्र कोंबड्यांचे अवशेष दिसून आले. या घटनेची माहिती सी.एम.आर.सी.व्यवस्थापक शरद कांबळे यांनी वनपाल मेश्राम यांना दिली. त्यानंतर वनपाल मेश्राम यांनी वनरक्षक शिंदे यांना घटनास्थळी पाठवून चौकशी केली. मात्र, त्यानंतर पुढील कारवाई झाली नसल्याने रेंजर खोपडे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती ८ मार्च रोजी देण्यात आली. रेंजर खोपडे यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेचा पंचनामा केला.