बलात्कारप्रकरणी सात वर्षांची शिक्षा
By Admin | Updated: January 21, 2015 01:07 IST2015-01-21T01:07:36+5:302015-01-21T01:07:36+5:30
बलात्कारप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस सुनावली सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा.

बलात्कारप्रकरणी सात वर्षांची शिक्षा
आकोट : विवाहित महिलेवरील बलात्कारप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथील गोपाल खुमकर याला २0 जानेवारी रोजी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
खंडाळा फाट्यावर विवाहित महीला आपल्या कुटुंबासह शेतात राहत होती. १४ एप्रिल २0११ रोजी दुपारी ४ वाजता डॉ. शेख यांच्या शेतात ती शौचाकरिता गेली असता, बाजूच्या शेतात रखवाली करणारा आरोपी गोपाल खुमकर याने सदर महिलेवर बलात्कार केला. या घटनेच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी आकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सु. वा. चव्हाण यांच्या न्यायालयात चार साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली असता, घटनास्थळावरील साक्षीदार फितुर झाले; परंतु न्यायालयाने पीडित महिला, तपास अधिकारी यांची साक्ष तसेच इतर साक्षी-पुरावे, सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी गोपाल खुमकर याला दोषी ठरवत सात वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून चार हजार रुपये पीडित महिलेला नुकसानभरपाई देण्याचा आदेश पारित केला. या प्रकरणी सरकारी पक्षाची बाजू अँड. एस. आर. रहाणे यांनी प्रभावीपणे मांडली. आरोपीतर्फे अँड. व्ही. पी. मानकर यांनी काम पाहिले.