सात हजार किमी महामार्गांना अवैध वाहतुकीचा विळखा
By Admin | Updated: February 11, 2015 01:01 IST2015-02-11T01:01:14+5:302015-02-11T01:01:14+5:30
एसटी महामंडळाने केले सर्वेक्षण; दररोज कोट्यवधीचा फटका.

सात हजार किमी महामार्गांना अवैध वाहतुकीचा विळखा
अनिल गवई / खामगाव (बुलडाणा): राज्यातील तब्बल ७ हजार ३५१ मार्गांवर मोठय़ा प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव राज्य परिवहन महामंडळाकडून मार्च २0१४ ते जानेवारी २0१५ पर्यंत राबविण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे महामंडळाला दररोज कोट्यावधी रुपयांचा फटका बसत असल्याचे चित्र आहे.
अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी कोणतीही उपाययोजना होत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये अवैध प्रवासी वाहतुकीत सातत्याने भर पडत आहे. छोट्या मार्गावर १५-२0 अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने धावतात. हीच परिस्थिती मोठय़ा आणि मध्यम मार्गावर आहे. मोठय़ा मार्गावर ५0-५५ अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने धावत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. या वाहनांमुळे प्रवासी वाहतूक करण्यार्या एसटी मंडळाला राज्यात दररोज कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. राज्यभर ही परिस्थिती कायम असल्याने एसटीच्या अहवालावर राज्य सरकार काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
*अमरावती विभागात १६४५ मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूक
अमरावती विभागातील सुमारे १६४५ मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याची माहिती एका गुप्त सर्वेक्षणातून समोर आली आहे. अवैध प्रवासी वाह तुकीला आळा घालण्यासाठी महामंडळांकडून सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. मार्च २0१४ ते जानेवारी २0१५ पर्यंत राबविण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही गोपनीय माहिती गोळा करण्यात आली आहे. यासंदर्भातील अवैध वाहतूक करणार्या वाहनांच्या क्रमांकासह गुप्त अहवाल मुख्य सुरक्षा अधिकार्यांना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे.