‘पंदेकृवि’चे सात नवे वाण विकसित!
By Admin | Updated: April 20, 2015 01:43 IST2015-04-20T01:43:13+5:302015-04-20T01:43:13+5:30
उडिदाच्या सुधारित वाणाचा समावेश; ५५ च्यावर कृषी तंत्रज्ञानाच्या शिफारशी.

‘पंदेकृवि’चे सात नवे वाण विकसित!
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी शास्त्रज्ञांनी वर्षभर केलेल्या संशोधनाचा आढावा कृषी विद्यापीठाने घेतला आहे. यावर्षी उडिदाच्या सुधारित जातीसह इतर सहा वाणांवर या कृषी विद्यापीठाने संशोधन केले असून, ५५ च्यावर तंत्रज्ञानाच्या शिफारशी केल्या आहेत. हे सर्व संशोधन व शिफारशी राहुरी येथील महात्मा कृषी विद्यापीठ येथे होणार्या राज्यस्तरीय कृषी संशोधन समिती सभेत मांडण्यात येणार आहेत. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आतापर्यंत पंधराशेच्यावर वाण आणि प्रगत शेतीसाठी लागणार्या अत्यंत महत्त्वाच्या तंत्रज्ञान शिफारशी केल्या आहेत. यावर्षी या कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा आढावा ६ ते १६ एप्रिलपर्यंत घेण्यात आला आहे. या सभेत डाळवर्गीय, लिंबूवर्गीय, भाजीपालावर्गीय, ज्वारी, तेलबिया, मृद व जलसंधारण, कृषी अभियांत्रिकी, अवजारे व यंत्र संशोधन, पशुसंवर्धन व दुग्धविकास तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, कीटकशास्त्र, कापूस संशोधन, उद्यानविद्या, सुगंधी औषधी वनस्पती, गहू संशोधन आदी सर्वच प्रकारच्या संशोधनाचा आढावा घेण्यात आला आहे. कृषी शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचे सादरीकरण कृषी विद्यापीठस्तरीय तज्ज्ञ समितीसमोर मांडले. १७ एप्रिल रोजी या संशोधनाचा फेरआढावा तज्ज्ञ समिती घेतल्यानंतर सात नवे पिकाचे वाण प्रसारणासाठी राज्यस्तरीय संशोधन समितीसमोर मांडण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी अकोल्याच्या या कृषी विद्यापीठाचे १३ नवे वाणांसह तंत्रज्ञानाच्या शिफारशी राज्यस्तरीय संशोधन समितीने मान्य केल्याने या संशोधनाचे प्रसारण करण्यात आले आहे. यावर्षी सात नवे वाण व ५५ च्यावर कृषी तंत्रज्ञानाच्या शिफारशी केल्या जाणार आहेत.
*सुधारित उडिदाचे वाण विकसित
या कृषी विद्यापीठाने गेल्यावर्षी टीयू उडीद या नावाने उडीद पिकाचे बियाणे संशोधित केले आहे. यामध्ये पुन्हा सुधारित एकेल १0-१ हे सुधारित उडिदाचे बियाणे विकसित केले आहे. या उडिदाचे उत्पादन २५ ते ३0 टक्के अधिक आहे.