दीपक कांबळे हत्याकांडातील सात आरोपी जेरबंद
By Admin | Updated: May 18, 2015 01:20 IST2015-05-18T01:20:00+5:302015-05-18T01:20:00+5:30
हरिहरपेठेतील हत्याकांड प्रकरण.

दीपक कांबळे हत्याकांडातील सात आरोपी जेरबंद
अकोला - हरिहरपेठेतील रमाबाईनगरमधील रहिवासी दीपक वामन कांबळे यांच्या हत्याप्रकरणातील सात आरोपींना जुने शहर पोलिसांनी रविवारी शहराच्या विविध भागांतून अटक केली. या सात आरोपींव्यतिरिक्त आणखी दोन जणांना अटक करण्यात आली असून, त्यांचा गुन्ह्यात समावेश आहे की नाही, याचा तपास जुने शहर पोलीस करीत आहेत. सातही आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येईल. हरिहरपेठेतील रमाबाईनगरमध्ये रस्त्यावर शौचास बसल्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या वादानंतर दीपक वामन कांबळे (५0) यांची शनिवारी सकाळी धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. सुमारे डझनावर हल्लेखोरांनी त्यांच्या घरात घुसून केलेल्या हल्ल्यात दीपकचा जागेवरच मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ भगवान वामन कांबळे व मुलगी दुर्गा हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपकची हत्या करून त्याच्या कुटुंबीयांवर हल्ला करणारे सागर इंगळे, मनीष शिरसाट, अल्पेश ऊर्फ बाल्या आजने, उमेश शिरसाट, दिलीप शिरसाट, अमर प्रभू सावळे, शंकर जाधव, सोबू जाधव, आशिष आजने, अजय प्रभू सावळे, दीपक ऊर्फ बांका सिरसाट हे शनिवारी दुपारीच फरार झाले होते. पोलिसांनीही त्यांचा तात्काळ शोध सुरू केल्यानंतर जुने शहर पोलिसांनी यामधील सात आरोपींना रविवारी अटक केली. यामध्ये संजय सुभाष शिरसाट, अल्पेश आजने, उमेश समाधान शिरसाट, दिलीप समाधान शिरसाट, अमर प्रभू सावळे, दीपक ऊर्फ बाळा समाधान शिरसाट, अजय प्रभू सावळे या आरोपींचा समावेश आहे.