शेतक-यांवर संकटाची मालिका
By Admin | Updated: November 19, 2014 02:31 IST2014-11-19T02:10:03+5:302014-11-19T02:31:01+5:30
कापसावर दहिया रोगाचा प्रकोप वाढतोय!

शेतक-यांवर संकटाची मालिका
अकोला : विदर्भातील शेतकर्यांवर संकटाची मालिका सुरू असून, खरीपातील सर्वच पिकांनी दगा दिल्यानंतर आता हाती येत असलेल्या कापसावरही दहिया या बुरशीजन्य रोगाचा प्रकोप वाढू लागला आहे. या रोगाचा नायनाट करण्यासाठी आता शेतकर्यांना खर्चात वाढ करणे क्रमप्राप्त असून, या चिंतेने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने मूग, उडीद पीक तर हातचे गेलेच, सोयाबीन यासह इतर खरीप पिकांचे उत्पादन घटले. शेतकर्यांची सर्व भिस्त कापूस या नगदी पिकावर होती. कापसाचे उत्पादनही घटले असून, त्यातच नव्याने दहिया या रोगाचा प्रकोप वाढू लागल्याने शेतकर्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. एक एकर कपाशी पेरणीसाठी शेतकर्यांना येणारा खर्च १३ हजारांवर गेला आहे. यामध्ये कीटकनाशकांच्या फवारणीवर जवळपास साडेचार हजार रुपये खर्च होतात. यावर्षी वातावरणात सारखा बदल होत गेल्याने कीटकनाशकांच्या फवारणीसाठी शेतकर्यांना अतिरिक्त खर्च करावा लागला. आातापर्यंतचे उत्पादन एकरी सरासरी दीड ते दोन क्विंटल आले असून, आता पुन्हा नवे संकट उभे ठाकल्याचे दिसत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.