वरिष्ठांची कनिष्ठ सभागृहाकडे धाव
By Admin | Updated: October 6, 2014 01:45 IST2014-10-06T01:38:09+5:302014-10-06T01:45:17+5:30
विधानपरिषदेचे १२ सदस्य विधानसभेच्या मैदानात

वरिष्ठांची कनिष्ठ सभागृहाकडे धाव
डॉ. किरण वाघमारे / अकोला
विधानसभेचा रणसंग्राम सुरु झाला आहे. अनेक हवसे आणि नवसे उमदेवार मैदानात आहेत. प्र त्येकचजन दंड थोपटून उभा आहे. अशातच जे विधानपरिषदेच्या माध्यमातुन आमदारकी भोगत आहे त्यांना देखील विधानसभेची हवा लागली आहे. राज्यातील १२ विधानपरिषद सदस्य विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत.
विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते. या सभागृहात तज्ज्ञ सदस्यांनी यावे आणि त्यांनी सरकारला मार्गदर्शन करावे हे अपेक्षित आहे. यासाठीच या सभागृहात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात येतो. परंतु मागील काही वर्षापासून विधानपरिषद हा राजकीय आखडा बनला आहे. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे पुनवर्सन करण्यासाठी या सभागृहाचा उपयोग करण्यात येत आहे. त्याही पुढे जाऊन जे पक्षाला निधी पुरवितात त्यांच्यासाठीच विधानपरिषदेचे सभागृह खुले करण्याचा पायंडा पाडला जात आहे. त्यामुळे विधान परिषदेत आता पूर्वीसारखे बौद्धीक अनुभवण्यास मिळत नाही. या वरिष्ठ सभागृहाची पातळी खालावत चालली आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभागृहात एकुण ७८ सदस्य आहेत. यामध्ये पक्षनिहाय विचार केला तर सर्वाधिक २८ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. त्या खालोखाल २२ सदस्य काँग्रेसचे, ११ सदस्य भाजपाचे तर शिवसेनेचे ६ सदस्य आहेत. याशिवाय लोकभारती, पीझंटस अँन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रत्येकी १ सदस्य आहेत. याशिवाय ७ अपक्ष आहेत. या ७८ सदस्यांपैकी १२ सदस्य विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रसेचे सर्वाधिक ६ सदस्य आहेत. काँग्रेसचे ३, भाजपाचे २ तर शिवसेनेचा १ सदस्य आहे.
विधान परिषदेत निवडुन आल्यावर सहा वर्ष फिकर नसते. परंतु यावर्षी विधानसभेचे आकर्षण काही विधान परिषद सदस्यांना वाटू लागले आहे. यावर्षी विधानसभेसाठी सर्व पक्ष मिळून १२ सदस्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.