महाबीज संचालक मंडळाच्या निवडणुकीतून सात उमेदवारांची माघार
By Admin | Updated: July 17, 2014 01:44 IST2014-07-17T01:34:53+5:302014-07-17T01:44:59+5:30
दोन मतदारसंघात ६ उमेदवार; २२ ऑगस्ट रोजी मतमोजणी

महाबीज संचालक मंडळाच्या निवडणुकीतून सात उमेदवारांची माघार
अकोला- महाबीज संचालक मंडळावर निवडून द्यावयाच्या दोन संचालकांसाठी होत असलेल्या निवडणुकीतून दोन मतदारसंघातून सात उमेदवारांनी बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे अकोला-विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघात प्रत्येकी ३ उमेदवार रिंगणात आहेत.
महाबीजच्या संचालक मंडळातील दोन निर्वाचित सदस्यांसाठीचा निवडणूक कार्यक्रम २५ जूनला जाहीर झाला. ९ जुलैपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. ११ जुलै रोजी अर्जांची छाननी करण्यात आली. बुधवार, १६ जुलै रोजी नामांकन अर्ज परत घेण्याची शेवटची मुदत होती. या मुदतीत अकोला विदर्भ मतदारसंघातून आकोट तालुक्यातील संजय पुंडकर आणि चरणगाव येथील नानासाहेब देशमुख यांनी माघार घेतली. त्यामुळे खासदार संजय धोत्रे यांच्यासह प्रशांत गावंडे आणि अमरावती जिल्ह्यातील प्रताप भोयर हे तीन उमेदवार रिंगणात आहेत. उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघात ८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी बुधवारी पाच जणांनी माघार घेतली. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये विद्यमान संचालक वल्लभराव देशमुख यांच्यासह नंदकुमार भोसले आणि राजेश पावडे यांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी भागधारकांना मतपत्रिका २४ जुलै रोजी पोस्टाने पाठविण्यात येणार आहेत. भागधारकांकडून भरून पाठविण्यात आलेल्या मतपत्रिका १४ ऑगस्टपर्यंत ६.३0 वाजेपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. मतपत्रिकांची छाननी १६ ऑगस्ट रोजी होईल. वैध मतपत्रिकांची यादी तयार करण्याचे काम २१ ऑगस्ट रोजी केले जाणार आहे. २२ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार असून, त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल.
*महाबीजचे भागदार असलेले मतदारसंघ
अकोला-विदर्भ मतदारसंघ : अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा आणि बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा हे दोन तालुके.
उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघ : परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, जालना, बीड, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड आणि बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, मोताळा, चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, शेगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यांचा समावेश आहे.