शिवसेनेच्या मेळाव्यासाठी चार शेतकऱ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2017 01:21 IST2017-05-19T01:21:37+5:302017-05-19T01:21:37+5:30
नाशिकमध्ये आज सेनेचा शेतकरी मेळावा

शिवसेनेच्या मेळाव्यासाठी चार शेतकऱ्यांची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात शिवसंपर्क अभियान सुरू केल्यानंतर आता नाशिक येथे उद्या (१९ मे) शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यासाठी शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, गुरुवारी सर्व पदाधिकारी आणि शेतकरी नाशिकसाठी रवाना झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय घेऊन शिवसेनेने राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे.
अभियानच्या माध्यमातून पक्ष बांधणीवर जोर दिला जात असतानाच विधानसभा मतदारसंघनिहाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. शिवसंपर्क अभियानची सुरुवात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये केल्यानंतर पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी नाशिक येथे १९ मे रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करणार असल्याचे सूतोवाच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि त्यावर उपाय शोधण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका उद्धव ठाकरे यांनी ठेवला होता. शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न राहील, असे दिसून येते.
मेळाव्यासाठी शेतकरी रवाना
नाशिक येथील मेळाव्यासाठी जिल्ह्यातील प्रमोद पागृत, ज्ञानेश्वर गावंडे, गजेंद्र देशमुख, राजेश पागृत या चार शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्यासह सेना पदाधिकारी गुरुवारी नाशिककडे रवाना झाले आहेत.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रणनीती आखल्या जाईल. जुलै महिन्यात शेतकऱ्यांना सोबत घेऊन पक्षाच्यावतीने ‘लाँग मार्च’ काढला जाणार असल्याची माहिती आहे. पक्ष प्रमुखांच्या आदेशानुसार कामकाज केले जाईल.
- नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख, शिवसेना