तेल्हारा तालुक्यात जलयुक्तच्या कामांसाठी १६ गावांची निवड
By Admin | Updated: May 16, 2017 01:56 IST2017-05-16T01:56:24+5:302017-05-16T01:56:24+5:30
सन २०१६-१७ ची ४१ कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर

तेल्हारा तालुक्यात जलयुक्तच्या कामांसाठी १६ गावांची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : जलसिंचनात मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी म्हणून तालुक्यात मागील वर्षी जलयुक्तची मोठ्या प्रमाणात कामे झाली. सन २०१६-१७ ची ४१ कामे तालुक्यात चालू असून, सन २०१७-१८ करिता १६ गावांची निवड करण्यात आली.
राज्य शासन प्रत्येक गावात पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, यासाठी मागील पाच वर्षांपासून कृ षी विभाग, जलसंधारण उपविभाग अकोट, लघुसिंचन विभागामार्फत तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात मंजूर झाली होती. यामध्ये सन २०१५-१६ मध्ये तालुक्यातील ३८ गावांची निवड होऊन ७५१ कामे मंजूर होऊन त्यामधील ६८० कामे पूर्ण झाली होती. उर्वरित ७१ कामे सन २०१६-१७ मध्ये पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये खोलीकरण करणे, गाळ काढणे व बंधाऱ्यांची कामे आहेत. सन २०१७-१८ मध्ये तालुक्यातील १६ गावांचीच सदर कामांसाठी निवड करण्यात आली. यामध्ये सांगवी, खापरखेडा, अटकळी, खेलसटवाजी, खेलदेशपांडे, तळेगाव बु., मालठाणा बु., मालपुरा, पिवंदळ बु., शिवाजी नगर, उकळी बु., तुदगाव, तळेगाव पातुर्डा व अन्य गावांची निवड करण्यात येऊन सदर गावात शिवारफेरी काढून १५ मेपर्यंत आराखडे सादर करायची आहेत. तसा सर्व्हे कृ षी विभागाकडून चालू असला, तरी मागील वर्षाच्या तुलनेत जलयुक्तच्या कामासाठी तब्बल २२ गावांची निवड करण्यात आली. शासनाने जलयुक्तच्या कामासाठी अजूनही इतर गावांची निवड केल्यास पाण्याच्या पातळीत वाढ होऊन जलसिंचनामध्ये वाढ होईल. मागील तीन वर्षांमध्ये झालेल्या कामांमुळे बऱ्याच गावांतील पाण्याची पातळी वाढलेली दिसत आहे.
सन २०१७-१८ मध्ये जलयुक्तच्या कामासाठी १६ गावांची निवड करण्यात येऊन १५ मेपर्यंत शिवारफेरी काढून वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठविले जातील.
- सागर इंगोले, तालुका कृ षी अधिकारी, तेल्हारा.