डॉक्टरजवळील बेकायदेशीर औषधांचा साठा जप्त!
By Admin | Updated: December 9, 2014 00:40 IST2014-12-09T00:40:08+5:302014-12-09T00:40:08+5:30
अन्न व औषध प्रशासनाची रिधोरा येथे कारवाई

डॉक्टरजवळील बेकायदेशीर औषधांचा साठा जप्त!
सचिन राऊत /अकोला
रिधोरा येथील एका डॉक्टरकडे असलेला बेकायदेशीर औषधांचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी सोमवारी रात्री जप्त केला. डॉक्टरांना औषध विक्री करण्याचे अधिकार नसतानाही या डॉक्टरने औषध विक्री सुरू केली होती; मात्र प्रशासनाच्या अधिकार्यांनी डॉक्टरच्या या औषध विक्रीचा सोमवारी रात्री पर्दाफाश केला. सदर डॉक्टरची डिग्री तपासण्यात येणार असल्याचेही अधिकार्यांनी स्पष्ट केले.
औषध विक्री करताना परवानाधारक औषध दुकान व फार्मासिस्टच्या उपस्थितीतच औषध विक्री करण्याचा नियम आहे. चुकीचे औषध दिल्यास एखाद्या रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आणि हे प्रकार घडल्यामुळे औषध विक्रीसाठी कठोर नियम करण्यात आले आहेत. मात्र रिधोरा येथील डॉ. प्रवीण चोपडे यांनी नियमांना पायदळी तुडवीत आपल्या घरातूनच अँलोपॅथी औषधांचे विक्री सुरू केली होती.
या प्रकाराची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी रात्री डॉ. चोपडे यांच्या रिधोरा येथील रुग्णालयात व घरी छापा मारून सुमारे १0 हजार रुपयांचा अँलोपॅथी औषधांचा साठा जप्त केला. रुग्णालयात प्रीस्क्रिप्शन लिहून दिल्यानंतर डॉक्टरच्या घरी एका महिलेकडून सदर औषधे देण्यात येत असल्याचेही यावेळी समोर आले. या गंभीर प्रकरणाची अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकार्यांनी दखल घेत डॉ. प्रवीण चोपडे यांचे रुग्णालय व घरातील औषधसाठा सीलबंद केला आहे.
सदर औषधांचे देयक सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, देयक सादर केल्यानंतर आणि डिग्री तपासणी झाल्यावर सदर डॉक्टरवर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त एच. वाय. मेतकर, एम.एस. चौधरी, एस.एम. राठोड, जे. एम. झोपे व उमेश देशमुख यांनी केली. या कारवाईमुळे ग्रामीण भागात बेकायदेशीरित्या सुरु असलेल्या औषध विक्रीच्या व्यवहारावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.