गोवंशाचे १५ क्विंटल मांस जप्त

By Admin | Updated: September 2, 2015 02:30 IST2015-09-02T02:30:14+5:302015-09-02T02:30:14+5:30

बोलेरोतून सुरू होती वाहतूक; आकोट फैलमध्ये कारवाई.

Seized 15 qtyls of cattle | गोवंशाचे १५ क्विंटल मांस जप्त

गोवंशाचे १५ क्विंटल मांस जप्त

अकोला : राज्य शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यानंतरही गोवंशाची मोठय़ा प्रमाणात कत्तल करण्यात येत असल्याचे आकोट फैलमध्ये पोलिसांनी मंगळवारी रात्री गोवंशाचे सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे १५ क्विंटल मांस जप्त केल्यानंतर उघड झाले आहे. एका बोलेरो वाहनामध्ये गोवंशाचे सुमारे १५ क्विंटल मांस भरून त्याची विक्रीसाठी वाहतूक करीत असतानाच आकोट फैल पोलिसांनी ही कारवाई केली. आकोट फैलमधील एका चौकातून एम एच २९ टी ६९८९ क्रमांकाच्या बोलेरो वाहनातून गोवंशाच्या मांसाची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती आकोट फैल पोलिसांना मिळाली. यावरून आकोट फैल पोलिसांनी सदर वाहनाचा पाठलाग करून त्याची झाडाझडती घेतली असता यामध्ये गोवंशाचे मांस असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेऊन वाहनाची तपासणी केली असता यामध्ये ३ लाख ५0 हजार रुपये किमतीचे सुमारे १५ क्विंटल गोवंशाचे मांस आढळून आले. हे मांस पोलिसांनी जप्त केले असून, वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे. आकोट फैल पोलिसांनी या वाहनाचा चालक व क्लीनर या दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून गोवंशाच्या मालक कोण, याचा शोध घेण्यात आहे. गोवंशाची कत्तल रोखण्यासाठी राज्य सरकारने गोहत्या बंदी कायदा लागू करून सहा महिन्यांचा कालावधी उलटला; मात्र त्यानंतरही गोवंशाची कत्तल मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याचे मंगळवारी आकोट फैल पोलिसांनी पकडलेल्या गोवंशाच्या मांसावरून समोर आले आहे. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Seized 15 qtyls of cattle