बोगस बियाणे विकणार्या कंपन्यांना जिल्हाबंदी करा!
By Admin | Updated: August 5, 2014 01:09 IST2014-08-05T01:09:55+5:302014-08-05T01:09:55+5:30
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची शासनाकडे शिफारस

बोगस बियाणे विकणार्या कंपन्यांना जिल्हाबंदी करा!
अकोला- खरीप हंगामामध्ये पेरलेले बियाणे उगवले नसल्याचे जिल्ह्यातील १५0 च्यावर शेतकर्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. या शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले. शेतकर्यांना अशाप्रकारे अडचणीत आणणार्या कंपन्यांना जिल्हय़ात बियाणे विक्री करण्यास प्रतिबंध करावा, अशी शिफारस करणारा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सोमवारी घेण्यात आला. जिल्हा परिषद सभागृहात दुपारी २ वाजता आयोजित स्थायी समिती सभेत शिवसेनेचे सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी बोगस बियाण्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. उगवणशक्ती नसलेले बियाणे विक्री करणार्या कंपन्यांमुळे जिल्हय़ातील शेतकरी नागवला जात आहे. अशा कंपन्यांच्याविरोधात शेतकर्यांना ग्राहक मंचशिवाय दुसरा पर्याय नसतो. आधीच आर्थिक संकटात सापडलेला अल्पभूधारक शेतकरी बोगस बियाणे निघाल्यानंतर कंपन्यांच्याविरोधात कायदेशीर लढाईसुद्धा लढू शकत नाही. त्यामुळे अशा कंपन्यांना काळ्य़ा यादीत टाकून जिल्ह्यात बियाणे विक्री करण्यास बंदी करण्यात यावी, अशी शिफारस करणारा ठराव स्थायी समितीमध्ये घेण्यात आला. हा ठराव पांडे गुरुजी यांनी मांडल्यानंतर त्याला भारिप-बमसंचे गटनेते विजय लव्हाळे यांच्यासह सर्व सदस्यांनी एकमताने अनुमोदन दिले. यासभेला अध्यक्ष शरद गवई, उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, कृषी सभापती रामदास मालवे, समाजकल्याण व महिला बालकल्याण सभापती आदींची उपस्थिती होती.