बियाण्यांचे भाव अचानक वाढले!
By Admin | Updated: July 21, 2014 00:17 IST2014-07-21T00:17:03+5:302014-07-21T00:17:03+5:30
सोयाबीन बियाण्यांच्या भावात अचानक वाढ झाल्याने शेतकरी त्रस्त आहेत.

बियाण्यांचे भाव अचानक वाढले!
अकोला : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात झाल्याने बियाणे खरेदीसाठी शेतकर्यांची बाजारात लगबग सुरू झाली असून, अशा स्थितीत सोयाबीन बियाण्यांच्या भावात अचानक वाढ झाल्याने शेतकरी त्रस्त आहेत. या धावपळीत बोगस व बेकायदेशीर बीटी कापसाचे बियाणे शेतकर्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता असल्याने कापूस बियाणे खरेदी करताना शेतकर्यांना सजग रहावे लागणार आहे. या खरीप हंगामात कापसाचा पेरा वाढत असून, जिल्ह्यातील शेतकर्यांनी ५५ हजार ९५३ क्विंटल सोयाबीन तर ४ लाख ३३ हजार बीटी कापसाची पाकिटं खरेदी केली आहेत. यामध्ये आणखी वाढ झाली आहे. सध्या बाजारात कापूस बियाण्यांची मागणी वाढली आहे; परंतु अनेक नामवंत कंपन्यांचे बाजारातील बियाणे संपले आहे. त्यामुळे शेतकरी मिळेल ते कापसाचे बियाणे खरेदी करीत आहेत. या धावपळीत आरआर, राऊंडअप बीटी, तणावरची बीटी, वीडगार्ड बीटी असे अनेक बोगस व बेकायदेशीर बीटी कापसाचे बियाण शेतकर्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता असून, काही प्रमाणात हे बियाणे विकले गेले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, सोयाबीनचे ३0 किलो गोणीचे दर आठ दिवसापूर्वी २३00 रुपये होते ते आता २४५0 रुपये करण्यात आले आहेत. सोबतच इतर बियाण्यांचे भावदेखील वाढले आहेत. फसवणूक टाळण्यासाठी शेतकर्यांना बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी लागणार असून, खबरदारी म्हणून बियाणे खरेदीची पावतीही शेतकर्यांनी घेणे आवश्यक आहे.