लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: रेल्वेत जागा मिळविण्यासाठी प्रवासी रेल्वे पोलिसांच्या देखत स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत, अशा आशयाचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच अकोला रेल्वे पोलीस (आरपीएफ) यंत्रणा खडबडून जागी झाली. मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील अधिकाऱ्यांनीसुद्धा या वृत्ताची दखल घेतली असून, रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेत वाढ करण्याचे निर्देश त्यांनी अकोला ‘आरपीएफ’ला दिले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्या व लग्नसराईची धूम यामुळे अकोला मार्गे जाणाऱ्या जवळपास सर्वच रेल्वे गाड्यांना प्रवाशांची तुफान गर्दी आहे. आरक्षण मिळत नसल्याने, प्रवाशांना रेल्वे डब्यामध्ये जागा मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असली तरी, अनेक महाभाग गाडीमध्ये जागा मिळावी यासाठी रेल्वे रूळ ओलांडून फलाटाच्या विरुद्ध दिशेने जाऊन उभे राहतात. मध्यभागी असलेल्या रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या गाड्या, वर असलेली हाय टेंशन तार अशा अनेक धोक्यांची कल्पना असली तरी त्याकडे कानाडोळा केला जातो. यामध्ये अनेक महिलादेखील आपल्या लहानग्यांसह हा धोका पत्करतात. गाडी स्थानकात प्रवेश करतेवेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पिटाळून लावणे शक्य होत नसल्याने, गस्तीवरील रेल्वे पोलिसांनासुद्धा अशा प्रसंगी बघ्याची भूमिका घ्यावी लागत असल्याची शोकांतिका रेल्वे पोलिसांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हजारो रेल्वे प्रवाशांवर आजतागायत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. रेल्वे पोलीस जागरूक राहत असले तरी, प्रवाशांची मानसिकता बदलणे अशक्य असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी यावेळी दिली. दिवस आणि रात्र पाळीत प्रत्यक्ष गस्त, विशेष पथके, मोबाइल अॅप, हेल्पलाइन या सर्व माध्यमातून अकोला रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेचे कवच वाढविले असले तरी, अधिक व्यापक उपाययोजना करण्याचे निर्देश भुसावळ अधिकाऱ्यांनी दिले असल्याची प्रतिक्रिया आरपीएफ अधिकाऱ्यांनी लोकमतला दिली. क्षमतेपेक्षा भार अधिक- पूर्वीच्या तुलनेत अकोला मार्गे जाणाऱ्या प्रवासी गाड्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालीच आहे, शिवाय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाणदेखील प्रचंड वाढले आहे. तुलनात्मकदृष्ट्या बघितल्यास अकोला मार्गे जाणाऱ्या बहुतांश प्रवासी गाड्या या क्षमतेपेक्षा अधिक भार वाहत आहेत. - रेल्वे प्रशासनाने या मार्गावर खच्चून भरून जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये एकतर डबे वाढवावेत किंवा पॅसेंजर गाड्या वाढविल्यास जागा मिळविण्याकरिता प्रवाशांना धावपळ करावी लागणार नाही आणि अपघातांचे प्रमाणदेखील कमी होईल.
रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेत वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2017 01:21 IST