मोदींच्या सभांवर सुरक्षा यंत्रणा सावध
By Admin | Updated: October 1, 2014 23:23 IST2014-10-01T23:23:56+5:302014-10-01T23:23:56+5:30
भाजप नेत्यांमध्ये रस्सीखेच; १६ सभाच शक्य.

मोदींच्या सभांवर सुरक्षा यंत्रणा सावध
अकोला: विधानसभा निवडणुकीत सभा गाजविण्यासाठी भाजपकडे राज्यात सक्षम चेहराच नसल्याने पक्षाचे स्टार प्रचारक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जास्तीत जास्त सभा आपल्याच भागात व्हाव्यात, यासाठी नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु असून, याबाबत सुरक्षा यंत्रणेनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे. सुरक्षेचा आढावा घेवूनच मोदींच्या सभांचे नियोजन करण्यात येईल, असे सुरक्षा यंत्रणेने स्पष्ट केल्याने भाजप नेत्यांची गोची झाली आहे. महाराष्ट्रात मोदींच्या २३ ते २६ सभा व्हाव्यात अशी भाजप नेत्यांची इच्छा असली तरी, सुरक्षा यंत्रणेकडून केवळ १५ ते १६ सभांना हिरवी झेंडी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपकडे महाराष्ट्रात सभा गाजवेल, असा नेताच शिल्लक नाही. अशातच राज्यात युतीमध्ये ताटातूट झाल्याने शिवसेना-भाजप स्वतंत्र लढत आहे. भाजपने ह्यअब महाराष्ट्र, सब महाराष्ट्रह्ण, असा नारा दिला असला तरी, तशी वातावरणनिर्मिती राज्यात अद्याप झालेली नाही. त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सभांसाठी साकडे घातले आहे. मोदी यांच्या सभांना ४ ऑक्टोबरपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. भाजपची ताकद कमी असलेल्या मतदारसंघांमध्ये मोदींच्या सभांचे नियोजन करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त मोदी यांच्या १0 ते १२ रॅलींचेही आयोजन केले जाण्याची शक्यता आहे.