बाबासाहेबांचे दुसरे नातूही अकोल्याच्या राजकीय आखाड्यात!
By Admin | Updated: July 25, 2014 00:49 IST2014-07-25T00:49:23+5:302014-07-25T00:49:23+5:30
भारिप-बमसंपुढे रिपब्लिकन चळवळीतूनच आव्हान

बाबासाहेबांचे दुसरे नातूही अकोल्याच्या राजकीय आखाड्यात!
अकोला : रिपब्लिकन चळवळीतील आणखी एक नेता अकोला जिलतील राजकीय आखाड्यात उतरत आहे. इंदू मिलच्या प्रश्नानंतर राज्यातील राजकारणात खर्या अर्थाने प्रकाशझोतात आलेल्या आनंदराज आंबेडकर यांनी त्यांच्या रिपब्लिकन सेनेची स्थापना अकोला जिलतही करण्याचा निर्णय घेतला आहे. भारिप-बहुजन महासंघाच्या गडातील त्यांचा हा प्रवेश अँड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दुसरे नातू आनंदराज आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अकोला जिलतील राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्त्यांपुढे आणखी एक पर्याय उभा होणार असल्याने, राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. भारिप-बहुजन महासंघाचा अकोला जिलत दबदबा आहे. या जिलतील राजकारणात अँड. प्रकाश आंबेडकर यांनी १९८२ साली प्रवेश केला होता. १९८४ साली त्यांनी पहिल्यांदा अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली. पुढे भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून त्यांनी जिलतील राजकारणात पाय रोवले. १९९२ साली त्यांनी माजी मंत्री मखराम पवार यांना सोबत घेऊन बहुजन महासंघाची स्थापना केली. १९९४ साली रिपब्लिकन चळवळीतील नेत्यांनी ऐक्य घडवून आणले आणि अँड. आंबेडकर यांनी त्यांचा भारतीय रिपब्लिकन पक्ष मोडित काढला; परंतु रिपब्लिकन ऐक्याचे भवितव्य लक्षात घेऊन त्यांनी बहुजन महासंघ कायम ठेवला होता. पुढे दीड वर्षातच रिपब्लिकन ऐक्याची शकले उडाली. त्यानंतर बहुजन महासंघासोबतच भारिपची चळवळ सुरू करण्यात आली आणि भारिप-बमसं हा पक्ष स्थापन करून अँड. आंबेडकर यांनी राजकीय प्रवास पुढे सुरू ठेवला. आनंदराज आंबेडकर यांनीही त्यांची राजकीय खेळी याच पक्षामधून सुरू केली होती. पुढे राजकीय महत्त्वाकांक्षेतून ते भारिप-बमसंपासून दूर झाले आणि रिपब्लिकन सेनेचे साम्राज्य राज्यात वाढविण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात इंदू मिल चळवळ सुरू झाली. राज्यात अकोला वगळता सर्वच जिलंमध्ये रिपब्लिकन सेनेने या चळवळीच्या माध्यमातून पाय पसरविण्यास सुरुवात केली. अकोल्यात त्यांचे बंधु अँड. प्रकाश आंबेडकर यांचेच वर्चस्व असल्याने, आनंदराज आंबेडकर यांनी अकोल्यापासून सुरक्षित अंतर ठेवले होते; मात्र आता लोकसभा निवडणूक आटोपताबरोबर आनंदराज आंबेडकर यांनी अकोला जिलतही प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आनंदराज आंबेडकरांच्या सक्रीय राजकारणाचे पडसाद भारिप-बहुजन महासंघामध्ये कसे उमटतात, हे पाहण्यासारखे राहणार आहे.