गृहराज्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसकडून तुल्यबळ उमेदवाराचा शोध!
By Admin | Updated: March 28, 2016 01:38 IST2016-03-28T01:38:39+5:302016-03-28T01:38:39+5:30
अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी संजय खोडके, अविनाश चौधरी, भय्या मेटकर यांची नावे आघाडीवर.

गृहराज्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसकडून तुल्यबळ उमेदवाराचा शोध!
अकोला: विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवाराचा शोध काँग्रेसने सुरू केला आहे. त्यासाठी प्रदेश सचिव संजय खोडके यांच्यासह भय्या मेटकर आणि अविनाश चौधरी यांचे नावे आघाडीवर आहेत.
अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पाच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्याअनुषंगाने काँग्रेसने उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी गत बुधवारी मुंबईत इच्छुक उमेदवारांची बैठक घेतली. या मुलाखतीसाठी प्रामुख्याने काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके, भय्या मेटकर, लतीफ देशमुख आणि अविनाश चौधरी या अमरावतीतील उमेदवारांसह बुलडाणा जिल्ह्यातील प्रा. संतोष आंबेकर आणि समीर नागोळे यांनी मुलाखती दिल्यात.
अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे करीत आहेत. राज्यमंत्र्यांच्या विरोधात अमरावती पदवीधर मतदारसंघात लढाई असल्यामुळे काँग्रेसने आतापासून सावध पावले टाकायला प्रारंभ केला आहे.
संजय खोडके हे गत सहा महिन्यांपासून पदवीधर मतदारसंघ लढविण्याची तयारी करीत आहेत तसेच भाजपचे पदाधिकारी असलेले अविनाश चौधरी हेदेखील मुंबई येथील काँग्रेस कार्यालयात दाखल झाल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य भय्यासाहेब मेटकर हेदेखील काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत.