नर्मदेत वाहून गेलेल्या दोन्ही युवकांचा शोध सुरूच !
By Admin | Updated: August 25, 2016 01:59 IST2016-08-25T01:59:39+5:302016-08-25T01:59:39+5:30
अकोला जिल्हा प्रशासन मध्य प्रदेश सरकारच्या संपर्कात; नदीकाठावरील ७0 गावांमध्ये शोधमोहीम.

नर्मदेत वाहून गेलेल्या दोन्ही युवकांचा शोध सुरूच !
अकोला, दि. २४: राधाकिसन प्लॉटमधील भाटियावाडी येथील रहिवासी तसेच कुल्फी विक्रेता आणि तोष्णीवाल ले-आउट परिसरातील पिंपळेनगर येथील रहिवासी दोन युवक मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथील नर्मदा नदीत मंगळवारी सकाळी वाहून गेले. या युवकांचा दोन दिवसांपासून शोध घेण्यात येत असून, त्यांचा थांगपत्ता पोलीस प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापन पथकाला लागलेला नाही.
दोन्ही युवकांच्या शोधासाठी नर्मदा नदीकाठावरील ७0 गावांत पाहणी करण्यात आली; मात्र त्यांचा शोध लागला नसल्याची माहिती योगेश पाठक यांचे बंधु राजेश पाठक यांनी दिली. मध्यप्रदेशातील उज्जैन आणि ओंकारेश्वर येथे सोमवारी दर्शनासाठी शहरातील तोष्णीवाल ले-आउट आणि राधाकिसन प्लॉट येथील तब्बल १८ युवकांची चमू शनिवारी रात्री अकोल्यातून रवाना झाली होती. मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास संजय जोशी त्यांचा मोठा भाऊ बंटी जोशी आणि योगेश पाठक हे तिघे नर्मदा नदीत आंघोळ करीत असताना नदीचा प्रवाह अचानक वाढल्याने योगेश पाठक आणि संजय जोशी हे दोघे पाण्यात वाहून गेले. मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास हे दोघे नदीमध्ये वाहून गेल्यानंतर मध्यप्रदेश पोलीस प्रशासन, आपत्कालीन पथकांनी या दोन युवकांचा शोध सुरू केला आहे. मंगळवारी पहाटेपासून या दोन युवकांचा शोध घेण्यात येत असला तरी बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत त्यांचा कुठलाही पत्ता लागलेला नाही. या नदी पात्रात एका युवकाचा मृतदेह मिळाल्याची माहिती मंगळवारी रात्री समोर आली होती; मात्र ही अफवा असल्याचेही स्पष्ट झाले आहे.