बीएसएनएलच्या मुख्यालयाला सील
By Admin | Updated: March 4, 2015 02:25 IST2015-03-04T02:24:18+5:302015-03-04T02:25:47+5:30
पाणीपट्टी व मालमत्ता कराचे १ कोटी ६९ लाख थकीत असल्याने अकोला मनपाची कारवाई.

बीएसएनएलच्या मुख्यालयाला सील
अकोला : पाणीपट्टी व मालमत्ता कराच्या १ कोटी ६९ लाख रुपयांचा भरणा न केल्यामुळे भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या मुख्यालयाला सील लावण्याची ऐतिहासिक कारवाई मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी मंगळवारी केली. कार्यालयातील तांत्रिक सेवा विभाग वगळता तब्बल १४ प्रशासकीय विभाग कुलूपबंद केल्याने बीएसएनएलचे प्रशासकीय कामकाज पूर्णत: कोलमडले. या कारवाईमुळे मालमत्ता कराची थकबाकी असणार्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
बीएसएनएल कार्यालयाकडे मालमत्ता कराचे ६४ लाख, तर पाणीपट्टीचे १ कोटी ५ लाख रुपये थकीत आहेत. यासंदर्भात मनपाने संबंधित कार्यालयाला वेळोवेळी सूचना व नोटीस दिल्यानंतर प्रबंधक आनंद कुमार त्रिपाठी यांनी २६ फेब्रुवारीपर्यंत रकमेचा भरणा करण्यासाठी अवधी मागितला होता. रकमेचा भरणा न करता बीएसएनएलने २६ फेब्रुवारी रोजी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली. संबधित याचिकेवर अद्यापपर्यंत सुनावणी झाली नाही. तथापि, सीलची कारवाई करण्याचा अधिकार असल्याचा दावा करीत ३ मार्च रोजी मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी बीएसएनएलच्या मुख्यालयाला सील लावले. तांत्रिक सेवा विभाग वगळता १४ प्रशासकीय विभाग कुलूपबंद करण्यात आले. ही कारवाई साहाय्यक आयुक्त राजेंद्र घनबहाद्दुर, क्षेत्रीय अधिकारी कैलास पुंडे, वासुदेव वाघाडकर, शहर अभियंता अजय गुजर, कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर, कर अधीक्षक विजय पारतवार, उपअभियंता नंदलाल मेश्राम, अतिक्रमण अधिकारी विष्णू डोंगरे, पथकप्रमुख मुमताज अली, नरेंद्र घनबहाद्दुर यांसह सुरक्षा रक्षकांनी पार पाडली.