मूर्तिजापूर आगारात कुशल कर्मचार्यांचा तुटवडा
By Admin | Updated: May 29, 2014 23:25 IST2014-05-29T19:54:57+5:302014-05-29T23:25:10+5:30
राज्य परिवहन महामंडळाचे मूर्तिजापूर आगाराकडे दुर्लक्ष; अनेक पदे रिक्त.

मूर्तिजापूर आगारात कुशल कर्मचार्यांचा तुटवडा
मूर्तिजापूर : अकोला जिल्ह्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या मूर्तिजापूर येथील आगाराची निर्मिती होऊन बरीच वर्षे झाली असली तरी राज्य परिवहन महामंडळाचे या आगाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. या आगारात अनेक पदे रिक्त असून, कुशल कर्मचार्यांची वानवा आहे. आगारासाठी लिपिकाची दहा पदे मंजूर आहेत; परंतु केवळ चार पदे भरलेली असून, उर्वरित सहा पदे रिक्तच आहेत. वाहतूक नियंत्रकाच्या नऊ मंजूर पदांपैकी एक पद रिक्त आहे. संपूर्ण आगाराचा लेखाजोखा पाहणारे लेखाधिकारी हे एकमेव पद मंजूर आहे; परंतु हे पदही रिक्तच असल्याने आगाराचा कारभार लेखाधिकार्याविनाच सुरू आहे. यावरून मूर्तिजापूर आगाराकडे महामंडळाचे किती दुर्लक्ष होत आहे, याचा अंदाज येतो. आगारामध्ये यांत्रिक कर्मचार्यांचाही तुटवडा आहे. मंजूर पदांपैकी बॉडी फिटर, इलेक्ट्रिशियन, टायर फिटर, वाहन परीक्षकांचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. आगारासाठी चालक व वाहकांची एकूण १५० पदे मंजूर आहेत. तथापि केवळ ११६ चालक व वाहक कार्यरत आहेत. मूर्तिजापूर आगारातील रिक्त पदे भरण्याकरिता प्रशिक्षित कर्मचार्यांची मागणी विभाग नियंत्रकांकडे करण्यात आली असल्याचे मुर्तिजापूर आगर व्यवस्थापक किरण कावळे यांनी सांगीतले.