श्रीरामाच्या मूर्तीसाठी माना ग्रामस्थांनी केला होता सत्याग्रह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST2021-04-21T04:19:14+5:302021-04-21T04:19:14+5:30
जामठी बु. : अकोला जिल्ह्यातील सेंट्रल रेल्वेस्थानक असलेले माना हे मूर्तिजापूर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेले गाव आहे. या गावाला ...

श्रीरामाच्या मूर्तीसाठी माना ग्रामस्थांनी केला होता सत्याग्रह!
जामठी बु. : अकोला जिल्ह्यातील सेंट्रल रेल्वेस्थानक असलेले माना हे मूर्तिजापूर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेले गाव आहे. या गावाला पांडव कालीन बभ्रुवाहन राजाची राजधानी मणिपूर असे नाव होते, अशी आख्यायिका आहे. ३ जुलै १९३५ ला ‘श्रीराम प्रभूची’ देखणी मूर्ती सापडली. त्यावेळी ब्रिटिश सत्ता होती. शासकीय आदेशानुसार सापडलेली मूर्ती नागपूर येथे पाठविण्याचे आदेश ब्रिटिशांनी दिले होते; परंतु माना येथील समस्त नागरिकांनी विरोध करीत, श्रीरामाची काळ्या पाषाणातील मूर्ती माना येथून कोठेही हलविण्यात येऊ नये, यासाठी सत्याग्रह केला होते. अखरे ग्रामस्थांच्या विरोधासमोर ब्रिटिश शासन झुकले आणि त्यांनी श्रीरामाची मूर्ती माना येथेच ठेवली.
माना गाव पुरातन म्हणून ओळखले जाते. गावामध्ये भूमिगत लादण्या, गोपुरे, पुरातन मंदिरे, भग्न झालेल्या मूर्तींचे अवशेष आढळून येतात. माना गावाला लागून दक्षिण- उत्तर दिशेने वाहणारी उमा नदी आहे. या नदीच्या काठावर पुरातनकालीन गढीवजा किल्ला आहे. माना या नगरीचे भाग्य पुन्हा एकदा उदयास आले. ८ मे १९५१ यादिवशी एका शेतकऱ्याला शेत नांगरणी करताना ‘श्री कृष्ण प्रभूची’ मूर्ती सापडली. माना गावातच नागरिकांनी भव्य मंदिर उभारून त्या दोन्ही मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली.
सापडलेल्या दोन्ही मूर्ती काळ्या पाषाणातील असून, त्यावर बारीक कलाकुसर कोरली आहे. आपल्या देशात दुर्मीळ असलेल्या कसवटीच्या दगडांपासून मूर्ती घडवलेल्या आहेत. संस्थानचे विद्यमान अध्यक्ष श्री बाळासाहेब देशमुख, सचिव श्री. शिवनारायण व्यास व त्यांची कार्यकारिणीने विशेष परिश्रम घेऊन संस्था भरभराटीस आणली आहे आणि या पंचक्रोशीचे वैभव वाढविले आहे.
फोटो: