आत्मक्लेश सत्याग्रहाला समाजसेवकांचे आर्थिक बळ!
By Admin | Updated: March 16, 2016 08:38 IST2016-03-16T08:38:13+5:302016-03-16T08:38:13+5:30
जामदरा येथे मान्यवरांच्या भेटी; शेतक-यांचा खरीप हंगामावर बहिष्कार.

आत्मक्लेश सत्याग्रहाला समाजसेवकांचे आर्थिक बळ!
वाशिम: जामदरा (कवठळ) येथील शेतकर्यांनी यावर्षीच्या खरीप हंगामावर बहिष्कार टाकला. त्यांनी शासनाकडे कोणतीही मदत न करता मजुरी करून पोट भरण्याचा घेतलेला निर्णय हा एकप्रकारचा आत्मक्लेश सत्याग्रहच असून, गाववासियांना समाजसेवकांनी आर्थिक सहाय्य करण्यास सुरुवात केली आहे.
गत तीन वर्षांपासून सुरू असलेल्या दुष्काळामुळे जामदरा कवठळ येथील शेतकर्यांनी यावर्षी खरीप हंगामात पेरणी न करता शेत पडीक ठेवण्याचा निर्णय घेतला. शासनाकडे कोणतीही मागणी न करता त्यांनी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा निर्णय घेतला आहे. हे एकप्रकारे शासनाच्या विरोधातील आत्मक्लेश सत्याग्रहच आहे. जामदरा येथील शेतकर्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता जिल्हा परिषदेचे सदस्य तथा शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, बाबासाहेब धाबेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव फाले, यवतमाळ जिल्हय़ातील नेर येथील निकेश जैत यांनी मंगळवारी जामदरा येथे जाऊन शेतकर्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या समस्या जाणून घेऊन पुढील हंगामात काय करावे, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच गावकर्यांना त्यांनी आर्थिक सहाय्यही केले. कृषी विभागाने या गावात जाऊन शेतकर्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मदत करण्याची हमी दिली. जामदरावासियांच्या आंदोलनाला आता आर्थिक सहाय्य मिळण्याचा ओघ सुरू झाला आहे.