संभाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमली अकोला नगरी
By Admin | Updated: May 15, 2015 01:37 IST2015-05-15T01:37:29+5:302015-05-15T01:37:29+5:30
छावाच्या शोभायात्रेत पारंपरिकतेला महत्त्व.

संभाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमली अकोला नगरी
अकोला : संभाजी महाराज जयंतीनिमित्त छावा संघटनेतर्फे गुरुवारी शहरातून मोठय़ा उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. संभाजी महाराजांच्या जयघोषाने टाळ मृदंगासोबतच आदिवासी नृत्य व लेझीम या सारख्या पारंपरिक देखावे शोभायात्रेत सादर करण्यात आले. गुरुवारी संभाजी महाराजांच्या जयघोषाने अकोला नगरी दुमदुमली होती. शिवाजी पार्क येथून काढण्यात आलेल्या शोभायात्रेचा शुभारंभ डॉ. गजानन नारे यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, शिवाजी पार्कस्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे व संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाकोडे, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, छावा संघटेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शोभायात्रेत यावेळी मनोहर गिरी यांनी संभाजी महाराजांची वेशभूषा धारण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेत ढोल ताशांसोबतच चार वारकरी मंडळांचा समावेश होता. तसेच पाच आखाडे, तिन लेझीम पथक व दहा देखाव्यांचा समावेश होता. यावेळी सहभागी मंडळांनी पिंजर्यातील वाघोबाचे नृत्य, लाठीकाठी, मानेतून व पोटातून तलवार घातलेला पुरुष, मल्लखांब प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसचे यावेळी सादर करण्यात आलेल्या बंजारा व आदिवासी समाजाच्या पारंपरिक नृत्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शिवाजी पार्क येथून निघालेली ही शोभायात्रा अब्दुलहमीद चौक, मानेक टॉकीज, जुना कापड बाजार चौक, टिळक रोड मार्गे शहर कोतवाली चौकात पोहोचली. दरम्यान, ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. तसेच शीतपेयाचे वितरण करण्यात आले.