- राजरत्न सिरसाट
अकोेला : पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यातील पाणी अतिशय अल्कधर्मी व खारे असून, या पाण्याच्या सेवनामुळे पशू, प्राण्यांना गंभीर स्वरू पाचे आजार होत असल्याचे प्राथमिक संशोधनातून पुढे आले आहे. शेतीसाठी हे पाणी उपयुक्त नाही म्हणूनच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने स्वतंत्र खारपाणपट्टा संशोधन केंद्राचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे; परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शासनाचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने संशोधन केंद्र मिळणे कठीण झाले आहे. कृषी विद्यापीठातर्फे आता ‘पोकरा’ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.पश्चिम विदर्भातील पूर्णा नदीच्या पूर्व व पश्चिम अशा दोन्ही भागांनी साधारणत: ४० ते ५० किलोमीटर रुंद व १५५ कि.मी. लांब खारपाणपट्टा आहे.अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यांतील १६ तालुक्यांतील ८९२ गावे या खारपाणपट्ट्यात मोडतात. सुमारे ३ लाख हेक्टरचे हे क्षेत्र आहे. या खारपाणपट्ट्यातील पाण्यात मिठाचे प्रमाण अधिक असल्याने पशू आणि पक्ष्यांवर विपरीत परिणाम होेत असल्याचा अभ्यास अकोल्यातील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांनी केला आहे. खारे पाणी आणि मिठाची विषबाधा या दोहोंचा कोंबडीवर्गीय पक्ष्यांच्या पांढऱ्या पेशीच्या निर्मितीवर विपरीत परिणाम होत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले, तर पशुधनात यकृताचे आजार दिसून आले. चयापचयाच्या अनेक समस्याही निर्माण झाल्या आहेत. जनावरांमध्ये पाण्यात विरघळलेले क्षार हे साधारणत: ५०० टीडीएस असतात. खारपाणपट्ट्यातील पशूंमध्ये हे प्रमाण ६००० टीडीएस म्हणजे दहापट दिसून आले आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या खारपाणपट्ट्यावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र केंद्र या विद्यापीठात देण्यात यावे, या मागणीचा प्रस्ताव डिसेंबर २०१३ व जानेवारी २०१५ तसेच २१०६, २०१८ मध्ये (आयसीएआर) भारतीय कृषी संशोधन परिषद व (एमसीईएआर) महाराष्टÑ कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे पाठविला होता. खारपाणपट्ट्यात जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश करण्यास तत्कालीन कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेल्या सूचनांचाही अंतर्भाव करण्यात आला. एमसीईएआरनेही या प्रस्तावाची दखल घेत, त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केलेले आहे; पण अद्याप कृषी विद्यापीठाला स्वतंत्र खारपाणपट्टा संशोधन केंद्र मंजूर झाले नाही.
स्वतंत्र खारपाणपट्टा संशोधन केंद्राचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. आता पुन्हा ‘पोकरा’तंर्गत प्रस्ताव देण्यात येत आहे.- डॉ. विलास भाले,कुलगुरू ,डॉ. पंदेकृवि, अकोला.