सर्व्हर डाउन झाल्याने स्टेट बँकेचे व्यवहार ठप्प
By Admin | Updated: February 18, 2017 03:29 IST2017-02-18T03:29:14+5:302017-02-18T03:29:14+5:30
तीन दिवसांपासून ग्राहक त्रस्त

सर्व्हर डाउन झाल्याने स्टेट बँकेचे व्यवहार ठप्प
संजय खांडेकर
अकोला, दि. १७-जिल्ह्यातील सर्वात मोठी बँक म्हणून गणल्या जाणार्या भारतीय स्टेट बँकेचे सर्व्हर गत तीन दिवसांपासून डाउन असल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा मनस्ताप अकोल्यातील हजारो ग्राहकांना सोसावा लागत असून, बँकेचे अधिकारी आणि कर्मचारीदेखील या प्रकाराने वैतागले आहेत.
स्थानिक टावर चौकातील भारतीय स्टेट बँकेतून दररोज जवळपास एक कोटीची उलाढाल होते. मात्र, बुधवारी सकाळपासून बँकेत येणार्या ग्राहकांना रक्कम मिळत नसल्याने ओरड सुरू झाली आहे. काही ग्राहकांची रक्कम ट्रान्सफर झालेली नाही, धनादेश वटविले गेले नाही, अनेक ग्राहकांच्या रकमाचा ताळमेळ चुकला. अशा तक्रारी घेऊन ग्राहक येथील मुख्य व्यवस्थापकांकडे धाव घेत आहेत. गत तीन दिवसांपासून सर्व्हर डाउन असल्याची सूचना बँकेचे अधिकारी उद्घोषक कक्षातून दररोज देत असले, तरी त्यावर बँकेकडून उपाययोजना मात्र आजपावेतो करण्यात आलेले नाही. त्यामुळे दररोज ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती शुक्रवारीदेखील कायम होती.
याबाबत माहिती घेतली असता, सेवानवृत्त अधिकारी-कर्मचारी, ईपीएफचे कर्मचारी आणि शासन सेवेतील विद्यमान अधिकारी-कर्मचारी अशा जवळपास ६0 हजार ग्राहकांचे वेतन स्टेट बँकेत दरमहा जमा होते. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत स्टेट बँकेत प्रचंड गर्दी असते. एटीएममधून आणि थेट खात्यातून रक्कम काढणार्यांची एकच गर्दी होत असल्याने सर्व्हरवर लोड येतो.
त्यामुळे महिन्याच्या पहिल्या आणि दुसर्या आठवड्यात ही समस्या स्टेट बँकेत उद्भवते. दहा वर्षांआधी स्टेट बँकेत २५१ कर्मचारी होते. बँकेचे व्यवहार संगणकीय झाले असून आता बँकेत आज केवळ ५२ कर्मचारी कार्यरत आहेत. बँक क्षेत्रातील व्याप आणि अद्ययावत स्वरूपाचा विस्तार वाढत असल्याच्या तुलनेत कर्मचार्यांची संख्या कमी पडत आहे. त्याचा त्रास ग्राहकांना सोसावा लागत आहे.
तीन दिवसांपासून कनेक्टिव्हिटी नसल्याची तक्रार वरिष्ठांकडे केलेली आहे. मात्र बीएसएनएल व आउटसोर्सिंग कंपनीतील अधिकार्यांना अद्याप यात यश आलेले नाही. पर्यायी व्यवस्थेसाठी रिलायन्सच्या टावरची यंत्रणा उभारली आहे. तांत्रिक अडचणी दूर होताच व्यवहार नियमित सुरळीत होतील.
-एस. टी. बोर्डे
मुख्य व्यवस्थापक, स्टेट बँक, अकोला