रा.स्व. संघाचा राजकारणावर प्रभाव
By Admin | Updated: September 28, 2014 23:45 IST2014-09-28T23:13:10+5:302014-09-28T23:45:35+5:30
अकोला येथील संघाच्या विजयादशमी उत्सवात शरदराव ढोले यांचे प्रतिपादन

रा.स्व. संघाचा राजकारणावर प्रभाव
अकोला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राजकीय किंवा धार्मिक संघटना नसून, हिंदूचं एक बलाढय़ संघटन आहे. संघ कधीही राजकारण करीत नाही; मात्र संघाचा राजकारणावर प्रभाव निश्चितच आहे, असे प्रतिपादन पश्चिम क्षेत्रीय धर्मजागरण प्रमुख शरदराव ढोले यांनी येथे केले. रा.स्व. संघाच्या विजयादशमी उत्सवामध्ये प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
उत्सवात प्रमुख अतिथी म्हणून अकोला जनता बँकेचे अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक भीमराव धोत्रे होते. व्यासपीठावर संघाचे विभाग संघचालक वासुदेवराव नळकांडे, नगर संघचालक प्रा. नरेंद्र देशपांडे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. स्वयंसेवकांनी विविध प्रकारचे योग, घोष, सूर्यनमस्कार प्रात्यक्षिके सादर केली.
१९४८ मध्ये देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी मी संघ नष्ट करेन, असे म्हटले होते; परंतु आज देशाचा पंतप्रधान म्हणून संघाचा एक स्वयंसेवक विराजमान झाला आहे. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी संघ राजकारण करणार नाही, मात्र संघाचा राजकारणावर प्रभाव असेल, असे सांगितले होते. देशाच्या राजकारणावर संघाचा प्रभाव आहे. भाजपच नाही तर इतर कोणताही पक्ष आला तरी आम्ही त्याला चालवू; परंतु त्यासाठी त्या पक्षाने हिंदूशी संबंधित, देशहिताशी संबंधित निर्णय घेतले पाहिजेत, असे शरद ढोले यांनी यावेळी स्पष्ट केले.
**मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वयंसेवक झटतात
निवडणुकांदरम्यान संघाचे स्वयंसेवक बाहेर पडून काम करतात. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती करतात. संघाच्या प्रयत्नांमुळेच मतदानाची टक्केवारी वाढली आहे. नागरिक मतदानासाठी बाहेर पडू लागले आहेत, असेही शरदराव ढोले यांनी सांगितले.