पातूर पंचायत समितीला ३.६४ कोटींचा दंड!
By Admin | Updated: March 16, 2016 08:38 IST2016-03-16T08:38:14+5:302016-03-16T08:38:14+5:30
नगर परिषदेलाही २.६१ कोटींचा दंड : गौण खनिज ‘रॉयल्टी’ची चुकवेगिरी

पातूर पंचायत समितीला ३.६४ कोटींचा दंड!
पातूर: तालुक्यातील विविध कामांसाठी मुरुम, वाळू, गिट्टी, माती आदी गौण खनिजाचा वापर करताना त्यापोटी द्याव्या लागणार्या स्वामित्व धन (रॉयल्टी) शुल्काचा पूर्णपणे भरणा न केल्याप्रकरणी पातूर पंचायत समितीला ३.६४ कोटी रुपये, तर नगर परिषदेला २.६१ कोटी रुपयांचा दंड तहसीलदार राजेश वझीरे यांनी ठोठावला आहे. याबाबतची नोटीस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना बजावण्यात आली आहे.
पातूर तालुक्यात पंचायत समितीच्यावतीने ८१ गावांमध्ये सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक, रस्त्याचे काम, समाजमंदिर बांधकाम, दुरुस्ती, आवारभिंत बांधकाम अशी विविध विकासकामे करताना मुरुम, वाळू, गिट्टी आदी गौणखनिजाचा वापर करण्यात आला.
या वापरापोटी ३ कोटी ८७ लाख ७ हजार ९६ रुपयांचे स्वामित्व धन शुल्क भरणे गरजेचे होते; परंतु पंचायत समितीकडून फक्त २ लाख ३५ हजार ८00 रुपयांचा भरणा करण्यात आला. त्यामुळे उर्वरित ३ कोटी ६४ लाख १३0४ रुपयांची वसुली करण्याची नोटीस गटविकास अधिकारी यांना पाठविली आहे. नगर परिषदेने शहरात केलेल्या विविध २२ कामांवर गौण खनिज उत्खनन व वाहतुकीचे परवाने जोडले नसल्याने त्यांना २ कोटी ६१ लाख रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. वाळूकरिता स्वामित्व धनाची रक्कम ८३३ रुपये असून, गिट्टी, मुरुमाकरिता प्रतिब्रास स्वामित्व धनाची रक्कम ११ मे २0१५ पर्यंत २00 रुपये, तर त्यानंतर ४00 रुपये करण्यात आली आहे. स्वामित्व धनावर दंडाची रक्कम १२ जून १0१५ पर्यंत तीनपट व त्यानंतर पाचपट करण्यात आली आहे. सदर काम शासकीय यंत्रणेने केले असल्याने जिल्हाधिकारी यांच्या मौखिक निर्देशाप्रमाणे दंडाची रक्कम कामात वापरण्यात आलेल्या गौण खनिजाच्या बाजारभावाच्या तीनपट किंवा पाचपट न आकारता, केवळ वेळावेळी वाढलेल्या गौण खनिजाच्या स्वामित्व धनाच्या तीनपट किंवा पाचपट लावण्यात आल्याचे महसूल विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.