कोअर बँकींगसाठी २५ कोटींची उधळपट्टी

By Admin | Updated: May 12, 2015 00:00 IST2015-05-12T00:00:57+5:302015-05-12T00:00:57+5:30

एसटी को-ऑप. बँकेत गैरव्यवहार झाल्याचा इंटकचे जयप्रकाश छाजेड यांचा आरोप.

Rs 25 crore extra money for core banking | कोअर बँकींगसाठी २५ कोटींची उधळपट्टी

कोअर बँकींगसाठी २५ कोटींची उधळपट्टी

बुलडाणा : स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँकेने मध्यंतरीच्या काळात राज्यातील सर्व बँकेच्या शाखा कोअर बँकींगने जोडल्या, यासाठी २५ कोटी रुपये खर्च केले. वास्तविक जे काम एक - दीड कोटीचे होते त्यासाठी कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या संचालक मंडळाने केल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (ंइंटक) चे अध्यक्ष माजी आ. जय प्रकाश छाजेड यांनी केला.
२७ मे रोजी स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊ घातली असून या निवडणूकीच्या प्रचारार्थ जयप्रकाश छाजेड बुलडाणा येथे आले असता ते लोकमतशी बोलत होते. मागील १५ वर्षापासून ही बँक मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या ताब्यात आहे. मात्र त्यांच्या कार्यकाळात बँकेची कोणतीच प्रगती झाली नसून उलट हि बँक संचालक मंडळासाठी भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. २५ कोटी रूपये खर्च करून कोअर बँकींग झाली खरी मात्र, सुरूवातीपासूनच कोअर बँकींग प्रणाली बंद आहे. राज्यात एकही एटीएम मशिन लावण्यात आले नाही. जे काम एक ते दिड कोटी रूपयात होऊ शकते त्यावर २५ कोटी रू पयाचा खर्च दाखवून गैरव्यवहार केला. असून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण आणि संघटनेचे सचिव हनुमंतराव ताटे यांनी गैरमार्गाने स्वत:च्या नातेवाईकांना बँकेत नोकर्‍या दिल्या तर, बॅँक सभासदांचे अपघात विम्याचे बेकायदेशीररित्या ३९0 रूपयाची कपात करून सभासदांकडून जास्तीची रक्कम उकळले. याशिवाय बँकेच्या १५६ कोटी रुपयाच्या ठेवी अत्यंत कमी व्यजदरात परराज्याच्या बँकामध्ये ठेवल्या आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आम्ही केल्याचे जयप्रकाश छाजेड यांनी सांगीतले.
यासंदर्भात एसटी को-ऑप. बँकेचे संचालक हनुमंतराव ताटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी केलेला आरोप बिनबुडाचा आणि अज्ञानपणाचा असल्याचे म्हटले. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनानुसारच कोअर बँकींगची कामे सुरू आहेत. यामध्ये कोठलाही आर्थिक गैरव्यवहार झाला नाही. एसटी को-ऑप. बँकेच्या निवडणुका असल्यामुळे मतांचे विभाजन करण्यासाठी विरोधकाकडून अपप्रचार व चिखलफेक सुरू असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Rs 25 crore extra money for core banking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.