अकोल्यात दरोडा, वृद्ध दाम्पत्यास लूटले
By Admin | Updated: October 22, 2014 18:24 IST2014-10-21T23:48:10+5:302014-10-22T18:24:03+5:30
अकोल्यातील गंगानगर भागातील घटना.

अकोल्यात दरोडा, वृद्ध दाम्पत्यास लूटले
अकोला: अकोल्यातील गंगानगर भागातील एका घरावर दरोडा घालून ७ ते ८ दरोडेखोरांनी एका वृद्ध दाम्पत्यास लुटल्याची घटना सोमवारी मध्यरात्री २.३0 ते ३ वाजताच्या सुमारास घडली. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अंबादासपंत माथुरकर(६५), त्यांची पत्नी प्रभावती हे मुलगा सचिन आणि सून श्वेता यांच्यासमवेत गंगा नगरात राहतात. सोमवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी माथुरकर यांच्या घराच्या मागच्या भागाचे दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दरोडेखोरांनी माथुरकर यांचा मुलगा व सून झोपलेल्या बेडरूमच्या दाराची कडी बाहेरून लावून घेतली. त्यानंतर दरोडेखोरांनी अंबादासपंत यांच्या बेडरूममध्ये प्रवेश करून, अंबादासपंत व त्यांच्या पत्नीस मारहाण केली. घरातील रोकड व अंगावरील सोन्याचे दागिने काढण्यास त्यांनी बजावले. दरम्यान प्रभावतींनी आरडाओरड सुरू केली. या आवाजामूळे त्यांच्या मुलाला जाग आली आणि त्याने बाहेर येण्याचा प्रयत्न केला; परंतू दरोडेखोरांनी त्याच्या बेडरूमचा दरवाजा आधीच बंद केला होता. या प्रकारामुळे माथुरकर यांची नात वेदांती व समृद्धी या रडायला लागल्या. दरोडेखोरांनी लोखंडी रॉडने अंबादासपंत आणि त्यांच्या पत्नीस मारहाण करून त्यांच्याकडील चाब्या घेतल्या. कपाटातील रोख ५0 हजार रूपये आणि २.३0 ते ३ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन त्यीनी पोबारा केला. दरोडेखोरांच्या मारहाणीत अंबादासपंत यांच्या डाव्या पायाचे हाड मोडले असून, डोक्याला गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यात त्यांची पत्नीही किरकोळ जखमी झाली.
*दोन घरांवर दरोड्याचा प्रयत्न
माथुरकर यांच्या घरावर दरोडा टाकण्यापूर्वी दरोडेखारांनी त्यांच्या घरामागे राहणारे नवीन त्रिवेदी यांच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरासमोर उभी असलेली मारूती कार चोरण्याचा प्रयत्न केला. त्रिवेदी यांच्या घराचे लोखंडी ग्रीलसुद्धा तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर दरोडेखोरांनी अरूण शाह यांच्या घरातही चोरी करण्याचा प्रयत्न केला.
*तीन पाळतीवर, पाच जण घरात
दरोडेखोरांपैकी तीन जण घराबाहेर थांबून हालचालींवर पाळत ठेवून होते. उर्वरित पाच जणांनी घरावर दरोडा टाकला. वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून रोकड व सोन्याचे दागिने लंपास केले.