अकोला जिल्हा परिषदेच्या कारभारात अडकली रस्ते, जनसुविधांची कामे
By Admin | Updated: March 16, 2016 08:38 IST2016-03-16T08:38:14+5:302016-03-16T08:38:14+5:30
२४ कोटी अखर्चित; ‘मार्च एन्ड’पर्यंत कामे मार्गी लागण्यावर प्रश्नचिन्ह.

अकोला जिल्हा परिषदेच्या कारभारात अडकली रस्ते, जनसुविधांची कामे
अकोला: जिल्हा वार्षिक योजना आणि सेस फंडातून निधी उपलब्ध असला तरी, जिल्हा परिषदेच्या कारभारात जिल्हय़ातल्या ग्रामीण भागातील २४ कोटी ४८ लाखांचे रस्ते व जनसुविधांची कामे अडकली आहेत. या विकासकामांचा निधी अद्याप अखर्चित असल्याने, ह्यमार्च एन्डह्णपर्यंत ही कामे मार्गी लागणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हय़ातील ग्रामीण भागातील रस्ते कामांसाठी सन २0१४-१५ या वर्षात जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) ११ कोटी ८६ लाखांचा निधी जिल्हा परिषदेला उपलब्ध झाला. उपलब्ध निधीतून एकूण ७१ पैकी केवळ आठ रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, या कामांवर १ कोटी ६७ लाखांचा निधी खर्च करण्यात आला. उर्वरित ६७ रस्त्यांची कामे अद्याप रखडली असून, या कामांचा १0 कोटी १९ लाख रुपयांचा निधी अद्याप अखर्चित आहे. सन २0१५-१६ या वर्षात जिल्हय़ातील ग्रामीण भागात रस्ते कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ७ कोटींचा निधी मंजूर आहे. तसेच जिल्हा परिषद सेस फंडातून ५ कोटींच्या २२0 रस्ते कामांचे नियोजन करण्यात आले; मात्र या कामांना जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळण्यास विलंब झाल्याने रस्त्यांची कामे अद्यापही सुरू करण्यात आली नाही. तसेच नावीन्यपूर्ण योजनेत जिल्हय़ातील स्मशानभूमी विकास व तीर्थक्षेत्रांचा विकास या जनसुविधांच्या कामांसाठी सन २0१४-१५ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ९५ लाख रुपयांचा निधी आणि २0१५-१६ या वर्षात १ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला उपलब्ध झाला; परंतु ही कामे मार्गी लागणे अद्याप बाकी आहेत. मार्च अखेरला (मार्च एन्ड) केवळ १६ दिवसांचा कालावधी उरला असताना, जिल्हा परिषद अंतर्गत रस्ते कामांचा २२ कोटी आणि जनुविधा कामांचा २ कोटी ४८ लाख, असा २४ कोटी ४८ लाखांचा निधी अखर्चित असल्याच्या स्थितीत, जिल्हा परिषदेच्या कारभारात अडकलेली रस्ते आणि जनुसविधांची कामे ह्यमार्च एन्डह्णपर्यंत मार्गी लागणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.