शहरातील पातूर-बाळापूर, पातूर-अकोला, पातूर-खानापूर, पीकेव्ही चौक ते संभाजी चौक जुना बस स्टॅन्ड या सर्व भागांतील सर्वच दुकाने बंद आढळून आली. त्याबरोबरच, पातूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्व किराणा दुकाने जनरल स्टोअर्स बंद आढळून आली. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात आढावा घेण्यासाठी रविवारी दुपारी बाळापूर उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी पातुरात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी शहरासह तालुक्याचा आढावा घेतला. नवीन नियमानुसार, शहरातील सर्व हॉटेल पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. मात्र, पार्सल सुविधा सुरू ठेवली जाणार आहे. जीम, शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत. सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजतापर्यंत याच कालावधीत व्यावसायिक दुकाने सुरू ठेवतील, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. बाळापूर उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांनी दुपारी पातूर शहराच्या बाजारपेठेत जाऊन वास्तविक परिस्थितीची पाहणी केली. त्याबरोबरच शहरात पैदल मार्च काढला. यावेळी तहसीलदार दीपक बाजड, ठाणेदार हरीश गवळी, शिर्ला ग्रामपंचायतीचे अक्षय गाडगे, संजय खर्डे, प्रमोद उगले, अंबादास इंगळे, आवेज आणि पातूर नगरपरिषदेच्या पथकातील देवेंद्र ढोणे आदी उपस्थित होते. गटविकास अधिकारी आणि त्यांचे यंत्रणा पंचायत समितीमध्ये आणि कार्यक्षेत्रात आढळून आली नसल्याने, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असल्याचे बाळापूर उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पातूर शहरासह तालुक्यात रस्ते ओस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:28 IST