पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याचे खोदकाम; अकोलेकरांची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 15:27 IST2019-05-26T15:27:47+5:302019-05-26T15:27:53+5:30
अकोला: ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्झरी बस स्टॅन्ड ते चित्रा टॉकीजपर्यंत सिमेंट रस्त्याच्या खोदकामाला प्रारंभ केला आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याचे खोदकाम; अकोलेकरांची परीक्षा
- आशिष गावंडे
अकोला: ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्झरी बस स्टॅन्ड ते चित्रा टॉकीजपर्यंत सिमेंट रस्त्याच्या खोदकामाला प्रारंभ केला आहे. नऊ महिन्यांपूर्वी रस्त्याचा कार्यादेश जारी होऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेतील समन्वयाचा अभाव अकोलेकरांच्या मुळावर उठला आहे. संबंधित कंत्राटदाराला पुढील नऊ महिन्यांत रस्त्याचे काम पूर्ण करण्याची अट असल्यामुळे जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाच्या दिवसांत या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अकोलेकरांना परीक्षेला सामोरे जावे लागणार असल्याचे दिसत आहे.
गतवर्षी आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पाठपुराव्यामुळे चार मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांसाठी शासनाकडून १५ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. मनपाच्या यंत्रणेवर विश्वास नसल्यामुळे की काय, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पहिल्या टप्प्यात सरकारी बगिचा ते इंटक कार्यालय, दुसºया टप्प्यात इंटक कार्यालय ते चित्रा टॉकीजपर्यंत सिमेंट रस्त्यासाठी निविदा प्रकाशित करण्यात आली. ‘पीडब्ल्यूडी’ने २३ आॅगस्ट २०१८ रोजी या कामाची वर्कआॅर्डर जारी केली. स्थानिक ‘आरआरसी’नामक कंपनीची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर रस्त्याचा मध्यबिंदू काढून महापालिका व महावितरण कंपनीचे विद्युत पोल तातडीने शिफ्टिंग करणे अपेक्षित होते. त्या कामासाठी मनपा व ‘पीडब्ल्यूडी’ने तब्बल आठ महिन्यांचा कालावधी व्यर्थ घालविला. एप्रिल २०१९ मध्ये मनपाच्या नगररचना विभागाने या रस्त्याचा मध्यबिंदू काढल्यानंतर मे महिन्यात ‘आरआरसी’ कंपनीने रस्त्याच्या खोदकामाला सुरुवात केली. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ‘पीडब्ल्यूडी’ने या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. कामाची गती न वाढविल्यास पावसाच्या दिवसांत अकोलेकरांना चांगलाच मानसिक त्रास सहन करावा लागेल, हे निश्चित मानल्या जात आहे.
विद्युत खांब ‘जैसे थे’; जीव धोक्यात
लक्झरी बस स्टॅन्ड ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, इंटक कार्यालय ते खत्री मार्केटपर्यंत रस्त्याच्या खोदकामाला प्रारंभ करण्यात आला असून, रस्त्याला अडथळा ठरणारे विद्युत खांब, मोठे वृक्ष अद्यापही कायम आहेत, हे येथे उल्लेखनीय. खांबाच्या भोवती खोदकाम केल्यानंतर खांबाला विद्युत पुरवठा करणारे वायर उघडे पडले असून, ते रस्त्याचे काम करणाºया मजुरांसोबतच सर्वसामान्य अक ोलेकरांसाठी धोकादायक ठरत आहेत.
प्रशासकीय यंत्रणांचा हवेत कारभार
रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्यासाठी ‘पीडब्ल्यूडी’ने मनपा तसेच महावितरणला पत्रव्यवहार केला. यावर मनपाचा कारभार अतिशय ढेपाळल्याचे चित्र असून, महावितरणकडून अद्यापही ‘इस्टिमेट’ तयार नसल्याची माहिती आहे. एकूणच, तीनही प्रशासकीय यंत्रणांचा हवेत कारभार सुरू असल्याचे दिसून येते.
पंधरा मीटर रुंद होईल रस्ता!
* सरकारी बगिचा ते इंटक कार्यालय- २६२ मीटर लांब, १ कोटी ८० लाखांची तरतूद
* इंटक कार्यालय ते खत्री मार्केट- २५८ मीटर लांब, १ कोटी ७० लाखांची तरतूद
* लक्झरी बस स्टॅन्ड ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल- ३०० मीटर लांब, तीन कोटींची तरतूद
२९० मीटर रस्त्याचे काम रखडले!
पहिल्या टप्प्यात सरकारी बगिचा ते इंटक कार्यालय, इंटक कार्यालय ते खत्री मार्केटपर्यंत रस्त्याची निविदा मंजूर झाली. दुसºया टप्प्यात लक्झरी बस स्टॅन्ड ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलपर्यंत ३०० मीटर रस्त्याची निविदा मंजूर करून कार्यादेश जारी केला. सदर काम ओबेरॉय नामक कंत्राटराने सुरू केले आहे. त्यापुढील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ते सरकारी बगिचापर्यंत अंदाजे २९० मीटर लांब रस्त्याचे काम रखडल्याची माहिती आहे.
अतिक्रमणामुळे कामाला खोडा
सरकारी बगिचा ते इंटक कार्यालयापर्यंतच्या मार्गावर काही ठिकाणी मालमत्ताधारकांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्त्याच्या कामाला खोडा निर्माण झाला आहे. रस्त्याचा मध्यबिंदू काढून रस्त्याचे खोदकाम करणाºया ‘पीडब्ल्यूडी’ने अतिक्रमणाच्या संदर्भात मनपाच्या नगररचना विभागाला आजपर्यंतही पत्र दिले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रस्त्याची गुणवत्ता टिकेल का?
यापूर्वी शहरात निकृष्ट ठरलेल्या सिमेंट रस्त्यांचा पूर्वानुभव लक्षात घेता या रस्त्याच्या गुणवत्तेकडे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देईल का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मोठ्या विश्वासाने रस्त्यांची कामे ‘पीडब्ल्यूडी’कडे सोपविली. अवघ्या सहा-सहा महिन्यांतच रस्त्यांची लागलेली वाट पाहता या विभागाची विश्वासार्हता शेवटच्या घटका मोजत असल्याचे बोलल्या जात आहे.
आम्ही विद्युत खांब हटविण्यासाठी मनपा व महावितरणला पत्र दिले आहे. काही ठिकाणचे अतिक्रमण व वृक्ष हटवावे लागतील. संबंधित दोन्ही विभागांनी प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे.
-संजय शेळके, शाखा अभियंता, ‘पीडब्ल्यूडी’ अकोला.