रस्ते हस्तांतरणासाठी ‘पीडब्ल्यूडी’ महापालिकेच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 01:38 IST2017-04-26T01:38:53+5:302017-04-26T01:38:53+5:30

अकोला : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या मनपा क्षेत्रातील राष्ट्रीय व राज्य मार्गांचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्यासाठी ‘पीडीब्ल्यूडी’ विभाग सरसावला आहे.

Road to transfer 'PWD' on the threshold of Municipal Corporation | रस्ते हस्तांतरणासाठी ‘पीडब्ल्यूडी’ महापालिकेच्या उंबरठ्यावर

रस्ते हस्तांतरणासाठी ‘पीडब्ल्यूडी’ महापालिकेच्या उंबरठ्यावर

सभागृहाचा ठराव किंवा प्रशासनाची हवी संमती

अकोला : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या मनपा क्षेत्रातील राष्ट्रीय व राज्य मार्गांचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्यासाठी ‘पीडीब्ल्यूडी’ विभाग सरसावला आहे. यासंदर्भात सभागृहाचा ठराव किंवा प्रशासनाची संमती आवश्यक असल्याची विनंती संबंधित विभागाने मनपा प्रशासनाकडे केल्याची माहिती आहे.
महापालिका क्षेत्रातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गालगत वाइन शॉप, बिअर बार तसेच दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना वाचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा प्रामाणिकपणे कार्यरत असल्याचे चित्र आहे. महापालिका हद्दीतील रस्ते मनपाकडे हस्तांतरित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सरसावला आहे. प्रशासकीय स्तरावर सर्व काही सुरळीत झाल्यास ‘पीडीब्ल्यूडी’ विभागाच्या अखत्यारितील रस्ते अवर्गीकृत केले जातील. त्यानंतर पुढील देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेकडे हस्तांतरित केले जाणार आहेत. जळगाव, लातूर, यवतमाळमधील रस्ते महापालिका व नगरपालिकांकडे हस्तांतरित केल्यानंतर राज्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांनी सदर महामार्ग त्यांच्या ताब्यात घ्यावेत, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सक्रिय झाल्याचे दिसून येते. त्या धर्तीवर स्थानिक ‘पीडब्ल्यूडी’ विभागाच्या वतीने मनपा प्रशासनाकडे विनंती करण्यात आल्याची माहिती आहे.

दारू व्यावसायिकांचा सर्वांनाच पुळका!
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य महामार्गालगतच्या दारू व्यावसायिकांवर संक्रांत आली आहे. संबंधित व्यावसायिकांना वाचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या जात आहेत.

खर्च न झेपणारा!
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय व काही राज्य मार्गांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाते. मनपाने सदर रस्ते ताब्यात घेतल्यास भविष्यात रस्ते दुरुस्तीचा भार मनपाला सोसावा लागेल. मनपाची आर्थिक स्थिती बिकट असताना सत्ताधारी भाजपसह प्रशासन या विषयाला मंजुरी देते का, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

या मार्गांचा राहील समावेश
बाळापूर मार्गावरील जुना जकात नाका ते लक्झरी बस स्टँड ते थेट शिवणी शिवरपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग, बाळापूर मार्ग ते अन्नपूर्णा माता मंदिर, श्रीवास्तव चौक ते डाबकी, खदान पोलीस ठाणे ते रेल्वे स्टेशन चौक ते अकोट फैल मार्ग, खदान पोलीस ठाणे ते सिंधी कॅम्प ते कौलखेड, खडकी मार्ग, टॉवर चौक ते जठारपेठ चौक ते उमरी मार्ग, धिंग्रा चौक ते गांधी रोड ते जयहिंद चौक ते जुना बाळापूर नाका, किल्ला चौक ते कमला नगर वाशिम बायपास चौक, सिटी कोतवाली ते टिळक रोड ते शिवाजी कॉलेज ते थेट अकोट फैल रोड .

शहरातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग मनपाने स्वीकारावे, अशी विनंती ‘पीडीब्ल्यूडी’ने केली आहे. ही बाब धोरणात्मक व प्रचंड खर्चिक असल्याने सभागृहाने निर्णय घ्यावा, प्रशासनाची तयारी नाही.
-अजय लहाने, आयुक्त मनपा.

Web Title: Road to transfer 'PWD' on the threshold of Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.