रिसोडला दमदार पाऊस
By Admin | Updated: July 10, 2014 22:34 IST2014-07-10T22:34:04+5:302014-07-10T22:34:04+5:30
रिसोडात तालुक्यात दमदार बसणार्या या पावसाने वाशिमसह कारंजा, मानोरा, मंगरूळपीर व मालेगाव तालुकावासीयांना पुन्हा एकदा निराश केले आहे.

रिसोडला दमदार पाऊस
वाशिम : यंदा मृग नक्षत्रापासून दडी मारून बसलेला पाऊस १0 जुलैला जिल्हावासीयांवर किंचितसा मेहेरबाण दिसून आला. मात्र, रिसोडात तालुक्यात दमदार बसणार्या या पावसाने वाशिमसह कारंजा, मानोरा, मंगरूळपीर व मालेगाव तालुकावासीयांना पुन्हा एकदा निराश केले आहे. यंदा मृग नक्षत्रामध्ये जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे जिल्ह्यातील काही शेतकर्यांनी पेरण्या उरकल्या होत्या. परंतु मृगात रिमझिम बसणार्या पावसाने त्यानंतर मात्र अचानक दडी मारली. परिणामी, जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या. शेतकर्यांनी पेरलेली बियाणे अंकुरली खरी, मात्र पावसाअभावी यातील बहुतांश पिके करपू लागली होती. परिणामी, शेतकरी हवालदिल झाले होते. पाऊस बरसावा यासाठी जिल्हावासीयांनी वरूणराजाला साकडे घालण्यास सुरूवात केली होती. गत आठ दिवसांपासून नभांगणात ढगांची मांदीयाळी दिसत असली तरी, प्रत्यक्षात पाऊस येत नव्हता. परंतु १0 जुलैला दुपारी २ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात पावसाने अचानक हजेरी लावली. रिसोडात हा पाऊस दमदार बरसला. मात्र वाशिम, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा तालुक्यावासीयांची पावसाने पून्हा एकदा निराशा केली. या पाचही तालुक्यात सकाळपासूनच पावसाळी वातावरण होते. मात्र पाऊस रिमझिमच झाला. ** यंदा पावसाने दडी मारल्यामुळे जलाशयांची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे बर्याच गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे.पाऊस आल्यानंतर परिस्थिती बदलेल अशी नागरिकांसह प्रशासनाची अपेक्षा होती मात्र अद्यापही जोरदार पाऊस न बरसल्याने टंचाईची चिंता कायम आहे. पाऊस नसल्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या उंबरठय़ावर उभा आहे. पाणी टंचाई सोबतच चारा टंचाईचेही संकट जिल्हावासीयांवर घोंगावत आहे. पाऊस नसल्यामुळे प्रशासनाने टंचाईच्या उपाययोजनांना मुदतवाढ दिली आहे.