तांदळाचा पुरवठा रखडला
By Admin | Updated: August 4, 2014 00:57 IST2014-08-04T00:57:34+5:302014-08-04T00:57:34+5:30
केंद्रीय वखार महामंडळाच्या अकोल्यातील गोदामात उचल करण्यायोग्य तांदुळाचा साठा उपलब्ध नसल्याने, पुरवठा रखडला आहे.

तांदळाचा पुरवठा रखडला
अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत केंद्रीय वखार महामंडळाच्या अकोल्यातील गोदामात उचल करण्यायोग्य तांदुळाचा साठा उपलब्ध नसल्याने, पुरवठा रखडला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील शिधापत्रिकाधारक जुलै महिन्यातील स्वस्त भावाच्या तांदूळ लाभापासून अद्यापही वंचित आहेत. धान्याचे वितरण करण्यासाठी केंद्रीय वखार महामंडळाच्या अकोल्यातील देशमुख फैलस्थित गोदामातून जिल्हय़ातील तालुकास्तरावरील शासकीय धान्य गोदामांना गहू व तांदूळ इत्यादी धान्याचा पुरवठा केला जातो. जिल्हा पुरवठा विभागामार्फत केंद्रीय वखार महामंडळाच्या या गोदामातून दरमहा प्राधान्य गटाच्या शिधापत्रिकाधारकांसाठी २८ हजार १0 क्विंटल आणि अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांसाठी ९ हजार ३९0 क्विंटल गहू तसेच प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांसाठी १९ हजार ७0 क्विंटल व अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांसाठी ७ हजार ४0 क्विंटल तांदूळ अशी धान्याची उचल केली जाते. केंद्रीय वखार महामंडळाच्या अकोल्यातील गोदामात धान्याची अफरातफर झाल्याचे प्रकरण गेल्या मार्च महिन्यात उघडकीस आले होते. त्यामुळे या गोदामातील धान्यसाठा निरंक करण्याचे निर्देश केंद्रीय वखार महामंडळाच्यावतीने देण्यात आले होते. त्या दृष्टीने या गोदामातील धान्यसाठा संपुष्टात येत आला असून, तांदूळ उचल करण्यायोग्य नसल्याने, जिल्हा पुरवठा विभागामार्फत या गोदामातून तांदुळाची उचल करण्यात आली नाही. जिल्हय़ानजीकच्या गोदामातून तांदुळाचा पुरवठा करण्याची मागणी जिल्हा पुरवठा अधिकार्यांमार्फत भारतीय खाद्य निगमच्या (एफसीआय) नागपूर येथील कार्यालयाकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. पर्यायी गोदामातून धान्याचा पुरवठा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे; मात्र तांदुळाची उचल अद्यापपर्यंत करण्यात आली नसल्याने, जिल्हय़ात जुलै महिन्यातील तांदुळाचा पुरवठा रखडला आहे.