क्रांतीज्योत यात्रेचा समारोप
By Admin | Updated: August 31, 2014 23:53 IST2014-08-31T23:43:19+5:302014-08-31T23:53:09+5:30
३१ शाळा महाविद्यालयांच्या ३६ हजार विद्यार्थ्यांचे केले प्रबोधन.

क्रांतीज्योत यात्रेचा समारोप
संतोष मुंढे/वाशिम
राष्ट्रसंतांच्या विचारांबाबत संपूर्ण विदर्भात जनजागरण करण्यासाठी आणि राष्ट्रसंतांचे नाव थोर पुरूषांच्या यादीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने काढलेल्या क्रांतीज्योत यात्रेचा समारोप रविवारी चंद्रपूर येथे करण्यात आला. विदर्भातील ३१ शाळा व महाविद्यालयातील ३६ हजार विद्यार्थ्यांंचे प्रबोधन करण्याचे काम या यात्रेने केले.
क्रांतीज्योत यात्रेचा समारोप चंद्रपूर येथे स्वातंत्र्यलढय़ात ज्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अटक झाली, त्या ठिकाणी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी करण्यात आला. थोर पुरुषांच्या यादीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव नसल्याचे वृत्त लोकमतने ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले. या मुद्यावर शासनाच्या अनास्थेविषयी राज्यभरातील गुरूदेव भक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला. ठिकठिकाणी निदर्शने, उपोषणे आणि आंदोलने झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करणार्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने राष्ट्रभावना जागृतीसह राष्ट्रसंतांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याच्या मागणीबाबत जनजागृती करण्यासाठी विदर्भातील अकराही जिल्ह्यात ९ ऑगस्टपासून क्रांतीज्योत यात्रा सुरु केली. राष्ट्रसंतांच्या मूळ गावातून सुरु झालेली ही यात्रा अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदीया आदी अकरा जिल्ह्यांमध्ये फिरली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनावर जनप्रतिनीधींच्या माध्यमातून दबाव वाढला असून, विदर्भातील चार खासदार आणि १८ आमदारांनी यासाठी शासनाकडे पाठपूरावा करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती अखील भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे प्रांत सेवाधिकारी भानुदास कराळे यांनी दिली. या यात्रेदरम्यान अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळाचे कराळे यांचेसह जवळपास १५ सेवाधिकार्यांनी प्रबोधनाचे काम केले.
क्रांतीज्योत यात्रेमुळे राष्ट्रसंतांचे लाखो गुरुदेवभक्त जागे झाले आहेत. शासनाने याबाबत निर्णय न घेतल्यास, ११ सप्टेबरला विदर्भातील प्रत्येक जिल्हा स्तरावर गुरुदेवसेवक धरणे देतील. शांतीच्या मार्गाने क्रांती घडविण्याची शिकवण गुरुदेवांनी दिली. त्यामुळे शासनाला जागे करण्यासाठी गुरुदेवभक्त शांतीच्या मार्गाने प्रयत्न करतील, असे अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाचे प्रांत सेवाधिकारी
भानुदास कराळे यांनी सांगीतले.
* अमरावती जिल्ह्यातून निघालेली क्रांतीज्योत यात्रा विदर्भातील ११ जिल्ह्यांसह ९0 शहरं, १७८ गावांमधून फिरली. यादरम्यान ३१८ ठिकाणी प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांंनी कोणत्याही आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी न होता, राष्ट्रसंतांचे नावं थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी पोस्टकार्डावर लिहून राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. याला सर्व विद्यार्थ्यांंनी सकारात्मक प्रतिसाद दिला. किर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार यांच्यासह महिला मंडळांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून राष्ट्रसंतांच्या विचारांविषयी प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे काम यावेळी करण्यात आले.