राज्यात १0 लाखांच्यावर तंट्यांचा लागला निकाल
By Admin | Updated: November 15, 2014 23:52 IST2014-11-15T23:52:25+5:302014-11-15T23:52:25+5:30
तंटामुक्त अभियानाला ग्रामस्थांचा प्रतिसाद.

राज्यात १0 लाखांच्यावर तंट्यांचा लागला निकाल
डॉ. किरण वाघमारे/अकोला
राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला संपूर्ण राज्यात व्यापक प्रतिसाद मिळाला आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत विविध स्वरूपाचे १0 लाख ७५ हजार ५३१ तंटे मिटविण्यात गावांमधील तंटामुक्त समित्यांना यश आले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण फौजदारी तंट्यांचे असून, महसुली तंट्यांचे प्रमाण अल्प आहे. सामोपचाराने तंटे मिटल्यामुळे न्यायालयाचा भार कमी झाला आहे.
गावांमधील तंटे गावातच निकाली निघावे, या उद्देशाने २00७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राज्य शासनाने सुरू केली.
या उपक्रमाला गावागावांमध्ये व्यापक प्रतिसाद मिळाला. गावांमध्ये तंटामुक्त समित्या स्थापन झाल्या. या समित्यांना न्यायालयाच्या धर्तीवर न्याय निवाडा करण्याचे अधिकार देण्यात आले. जवळपास १५0 गुन्ह्यांवर न्याय देण्याचा अधिकार समितीला प्राप्त झाला. फौजदारी स्वरूपातील गंभीर गुन्हे वगळता इतर सर्व गुन्ह्यांवर न्यायनिवडा करण्याचा अधिकार तंटामुक्त समित्यांना मिळाला. त्यामुळे न्यायालयाची पायरी चढण्याची पाळीच अनेक गावकर्यांवर आली नाही. तंटामुक्त मोहिमेला ग्रामस्थांचा भरपूर प्रतिसाद लाभल्यामुळेच आतापर्यंंत वेगवेगळ्या स्वरूपाचे १0 लाख ७५ हजार ५३१ तंटे मिटविण्यात यश मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक तंटे हे फौजदारी स्वरूपाचे आहेत. फौजदारी स्वरूपातील गुन्ह्यात न्यायनिवाडा करण्याचा अधिकार तंटामुक्त समितीला नसला, तरी फौजदारी गुन्हे होऊच नये, या दृष्टीने तंटामुक्त समितीने खबरदारी घेतली. समि तीने फौजदारी तंटे सामोपचाराने गावातल्या गावातच मिटविले आणि न्यायालयाचा वेळ वाचविला. यातून ग्रामस्थांचा पैसा आणि वेळदेखील वाचला.
तंटामुक्त मोहीम सुरू झाल्यावर पहिल्या वर्षी २00७-0८ मध्ये २ लाख ५ हजार ११५ तंटे मिटविण्यात आले. पुढील वर्षी २00८-0९ मध्ये २ लाख १८ हजार ८१३ , २00९-१0 मध्ये २ लाख २५ हजार ३0२ तंटे व त्यानंतरच्या काळात १ लाखापेक्षा जास्त फौजदारी तंटे मिटविण्यात आले. याच कालावधीत दिवाणी स्वरूपाचे ६८ हजार २५५ तंटे मिटविण्यात आले. यात पहिल्या वर्षी २0६६३, दुसर्या वर्षी १0२२५, तिसर्या वर्षी १४६९९ तर चौथ्या वर्षी १६८५७ तंटे मिटविण्यात आले. महसुली स्वरूपाचे ३३ हजार ३९९ तंटे मिटविण्यात समि त्यांना यश आले.