ग्रामसेवकांना वैयक्तिक रक्कम काढण्यावर बंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 14:15 IST2019-03-22T14:15:10+5:302019-03-22T14:15:20+5:30

अकोला : ग्रामपंचायतींमध्ये विविध विकास कामांच्या देयकाची रक्कम देण्यासाठी ग्रामसेवकांना ‘सेल्फ विड्रॉल’ करण्यावर बंधन आणण्यात आले आहे.

Restriction on withdrawn individual amounts for Gram Sevaks | ग्रामसेवकांना वैयक्तिक रक्कम काढण्यावर बंधन

ग्रामसेवकांना वैयक्तिक रक्कम काढण्यावर बंधन

अकोला : ग्रामपंचायतींमध्ये विविध विकास कामांच्या देयकाची रक्कम देण्यासाठी ग्रामसेवकांना ‘सेल्फ विड्रॉल’ करण्यावर बंधन आणण्यात आले आहे. एक रुपया देय असला तरीही ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून संबंधिताच्या खात्यावर देण्यात यावा, असे पत्र पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप भंडारे यांनी बुधवारी जिल्ह्यातील ग्रामसेवकांना दिले. तसा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला होता.
जिल्हा परिषदेसोबतच ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद दैनंदिन अधिकाऱ्यांना देत आहेत. त्यांच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतींच्या कामकाजात प्रामुख्याने दोन बदल केले जाणार आहेत. त्यामध्ये ग्रामसभांच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाईल, त्यासाठी यूट्युब चॅनल तयार केले जात आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. कोणत्याही सभेचे छायाचित्रण करून ते यूट्युबवर अपलोड करावे लागणार आहे. त्याशिवाय, ग्रामपंचायतमध्ये झालेल्या कोणत्याही कामाचे देयक अदा करण्यासाठी ग्रामसेवकांनी स्वत:च्या नावे रक्कम बँकेतून काढू नये, असे बंधन घातले आहे.
ज्यांची देयके अदा करावयाची आहेत, त्यांच्या खात्यावर ‘आरटीजीएस’द्वारे रक्कम हस्तांतरित करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. या प्रकारामुळे ग्रामपंचायतींच्या खात्यातून रक्कम परस्पर काढून ती वाटून घेण्याच्या पद्धतीला ब्रेक लागणार आहे. विशेष म्हणजे, १४ वित्त आयोगासाठी ही अट बंधनकारकच करण्यात आली आहे.
- वैद्यकीय देयक तातडीने मिळणार!
जिल्हा परिषदेच्या कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय देयक यापुढे अडथळ्याशिवाय मिळणार आहे. त्यासाठीची पूर्वतयारी आरोग्य विभागासह अर्थ विभागाकडून करून घेण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, वित्त विभाग यांच्या समन्वयातून देयकांना मंजुरी देत संबंधितांना रक्कम देण्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बजावले आहे.

 

Web Title: Restriction on withdrawn individual amounts for Gram Sevaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला