तुकडोजी महाराजांच्या भक्तांचा संघर्षाचा संकल्प
By Admin | Updated: October 16, 2014 00:08 IST2014-10-16T00:08:59+5:302014-10-16T00:08:59+5:30
राष्ट्रसंतांचा थोर पुरुषांच्या यादीत समावेश करण्याची मागणी.

तुकडोजी महाराजांच्या भक्तांचा संघर्षाचा संकल्प
वाशिम : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव देशातील थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याच्या मागणीस शासनाने बगल दिल्याने, गुरुदेवभक्त व्यथीत झाले आहेत. त्याअनुषंगाने राष्ट्रसंतांच्या ४६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त १३ ऑक्टोबरला आयोजित कार्यकर्ता संमेलनामध्ये, हजारो गुरुदेवभक्तांनी आता माघार न घेण्याचा निर्धार व्यक्त करून, लोकशाही मार्गाने या मुद्यावर शासनाशी लढा देण्याचा संकल्प केला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे देशाच्या स्वातंत्र्य लढय़ातील योगदान, तसेच देशाच्या नवनिर्मीतीसाठी त्यांनी केलेले कार्य विचारात घेऊन, राष्ट्रसंतांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करावे, तसेच शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रसंतांचे छायाचित्र लावण्यात यावे, असा प्रस्ताव मोझरी येथील अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमाने विभागीय आयुक्तांमार्फत ३१ ऑक्टोबर २0१२ रोजी शासनाकडे पाठविला होता.
दोन वर्षे त्याचा पाठपुरावा करण्यात आला; परंतू शासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी यासंदर्भात माहिती अधिकाराच्या माध्यमातून गुरुदेव सेवा मंडळाचे पुसद तालुका सेवाधिकारी प्रकाश दाभाडकर यांनी शासनाला विचारणा केली. त्यानुसार शासकीय कार्यालयांमधील थोर पुरुषांच्या छायाचित्रांची संख्या पाहता, आणखी छायाचित्र लावताना जागेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावावर निर्णय घेणे श क्य नसल्याचे शासनाने स्पष्ट केले. 'लोकमत'ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करताच, राष्ट्रसंतांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याची गुरुदेव सेवा मंडळाची मागणी चळवळीत बदलली.
राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करून गुरुदेव भक्तांनी मागणीची निवेदने सादर केली. ९ ते ३0 ऑगस्टदरम्यान विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये क्रांतीज्योत यात्रेच्या माध्यमातून व्यापक जनजागरण करण्यात आले. मात्र शासनाने अद्यापही ठोस भूमिका न घेतल्याने, राज्यात नवे सरकार आल्यानंतर तीव्र आंदोलन करण्याचे पदाधिकार्यांनी ठरविले आहे.