रणजित पाटील यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार

By Admin | Updated: September 4, 2014 01:38 IST2014-09-04T01:35:05+5:302014-09-04T01:38:47+5:30

रणजित पाटील यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार; मालमत्तेची अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप.

Report to the Election Commission against Ranjeet Patil | रणजित पाटील यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार

रणजित पाटील यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार

अकोला : अमरावती पदवीधर मतदारसंघातून २0१0 मध्ये निवडून आलेले आ. डॉ. रणजित पाटील यांनी निवडणूक आयोगास मालमत्तेची अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विक्रांत काटे यांनी केला असून, यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी डॉ. रणजित पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे ९ नोव्हेंबर २0११ रोजी सादर केलेल्या शपथपत्रामध्ये स्थावर मालमत्ता स्व त: आणि पत्नीच्या नावावर दाखविली आहे. मुलगा शर्व याच्या नावे कोणतीही मालमत्ता नसल्याचे त्यांनी शपथ पत्रात नमूद केले आहे. वास्तविक, त्यांच्या मुलाच्या नावावर मालमत्ता असल्याचा दावा घुंगशी येथील विक्रांत काटे यांनी केला आहे.
शर्व अण्णासाहेब पवित्रकार उर्फ शर्व रणजित पाटील याच्या नावे २ मार्च २000 रोजी खरेदी केलेल्या मौजे उमरखेड येथील महापालिका हद्दीतील ५२0६.२५ चौरस फूट (अंदाजे किंमत ३२ लाख रूपये) जागेचा शपथ पत्रात उल्लेख केला नाही. डॉ. पाटील यांनी २0१३ मध्ये ही जागा विकण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहीर नोटीस प्रसिद्ध केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. विक्रांत काटे यांनी निवडणूक आयोगाकडे माहिती अधिकारामध्ये विधान परिषद निवडणुकीच्यावेळी डॉ. रणजित पाटील यांनी दाखल केलेल्या शपथपत्राची प्रत मागितली. त्यात मुलाच्या नावावर असलेल्या मालमत्तेची माहिती दडविण्यात आली असल्याचे आढळून आल्याने काटे यांनी निवडणूक आयोगाकडे १२ ऑगस्ट २0१४ रोजी याबाबत तक्रार केली आहे.

निवडणूक आयोगाकडे तक्रार झाल्याबाबतचे कोणतेही पत्र किंवा नोटीस मिळाली नाही. तक्रार दाखल झाली असेल तर कायदेशीर मार्गाने त्याचा सामना करू. अनावधानाने एखादी माहिती देण्याची राहून गेली असेल, तर त्याबाबत कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ. ही तक्रार गावातील राजकीयद्वेषातून झाली असण्याची शक्यता आहे.
- आमदार डॉ. रणजित पाटील

Web Title: Report to the Election Commission against Ranjeet Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.