पाणीटंचाईमुळे बदलले विवाहाचे स्थळ
By Admin | Updated: May 9, 2017 19:53 IST2017-05-09T19:53:26+5:302017-05-09T19:53:26+5:30
परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून, याची झळ विवाह सोहळ्याच्या आयोजनाला बसत आहे.

पाणीटंचाईमुळे बदलले विवाहाचे स्थळ
आगर परिसरातील चित्र
आगर: परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून, याची झळ विवाह सोहळ्याच्या आयोजनाला बसत आहे. येथून जवळच असलेल्या हातला लोणाग्रा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष पाहता येथील पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या लग्नाचे स्थळच बदलले असल्याचे चित्र आहे.
खारपाणपट्टय़ातील आगर व परिसरातील हातला, लोणाग्रा येथे गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती पाहता ग्रामस्थांनी आपल्या मुला-मुलींच्या लग्नाचे स्थळच बदलणे सुरू केले आहे. पाणीटंचाईमुळे जेथे पाणी असेल त्या गावात विवाह करण्यास पालक उत्सुक असल्याचे चित्र आहे. परिसरातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी स्वाक्षरीचे निवेदन पालक मंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या कार्यालयात दाखल केले. या प्रकाराबाबत लक्ष देण्याची मागणी केली आहे. याबाबत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी कळविले आहे. याचा परिणाम लग्नसमारंभावर होत असल्याचे दिसून येत आहे. हातला येथील चक्रधर कसुरकार यांच्या वैशाली नामक मुलीच्या विवाह सोहळा बाखराबाद येथील योगेश माळी यांच्याशी आयोजित करण्यात आला होता; पण पाणीटंचाईमुळे सदर विवाह सोहळा ७ मे रोजी उगवा फाट्यावरील काशी विश्वनाथ महाराज मंदिर येथे पार पडला. पाणीटंचाईमुळे लग्नस्थळ बदलण्याची वेळ खारपाणपट्टय़ातील गावांवर आली आहे. (वार्ताहर)