महाराष्ट्रातून काँग्रेसरूपी घाण दूर करा - देवेंद्र फडणवीस
By Admin | Updated: October 3, 2014 01:33 IST2014-10-03T01:33:33+5:302014-10-03T01:33:33+5:30
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे अकोल्यात प्रतिपादन.

महाराष्ट्रातून काँग्रेसरूपी घाण दूर करा - देवेंद्र फडणवीस
अकोला : महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराचे विक्रम केले आहेत. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम या सरकारने केले. आज गांधी जयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा संकल्प केला आहे. आपणही आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेसरूपी घाण दूर करण्याचा संकल्प केला पाहिजे, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अकोल्यात व्य क्त केले. अकोला जिल्ह्यातील भाजपा उमदेवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी मंचावर भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी, खासदार संजय धोत्रे, उमेदवार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, तेजराव थोरात, हरीश पिंपळे, आमदार डॉ. रणजित पाटील, माजी आमदार जगन्नाथ ढोणे, महापौर उज्ज्वला देशमुख, हरीश आलिमचंदानी, प्रा. उदय देशमुख, रिपाइंचे डी. गोपनारायण, सुनील अवचार, वंदना वासनिक आदी उपस्थित होते. पुढे बोल ताना फडणवीस यांनी, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विकासाचा रथ देशात दौडत आहे. ही विकासाची गंगा महाराष्ट्रात आणण्यासाठी भाजपाची सत्ता हवी असल्याचे सांगितले. यावेळी फडणवीस यांनी आघाडी शासनाने केलेले विविध घोटाळेदेखील मांडले. भाजपाचे शासन आल्यावर एल.बी.टी. हद्दपार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.