रेमडेसिवीर ७५ टक्के रुग्णांसाठी ठरले संजीवनी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 11:25 IST2020-11-03T11:25:25+5:302020-11-03T11:25:40+5:30
CoronaVirus News, Remdesivir फुप्फुसांवर कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्यास त्यावर रेमडेसिवीर हे इंजेक्शन प्रभावी ठरू शकते.

रेमडेसिवीर ७५ टक्के रुग्णांसाठी ठरले संजीवनी!
अकोला: सर्वोपचार रुग्णालयात दाखल कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत २७८ गंभीर रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आले असून, जवळपास ७५ टक्के रुग्णांसाठी हे इंजेक्शन संजीवनी ठरल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनमुळे कोरोनाबाधितांचा संसर्गाचा दिवस कमी न झाल्याचे व गंभीर आजारी असलेल्या रुग्णंचे प्राण वाचविण्यात हे औषध परिणामकारक नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. असे असले तरी अनेक रुग्णांना या इंजेक्शनचा लाभ झाल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्राप्त माहितीनुसार, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत जवळपास २७८ रुग्णांना १,६८३ रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये आयसीयू आणि कोविड वॉर्डातील रुग्णांचा समावेश आहे. त्यापैकी जवळपास ६७ गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला; मात्र दिलासादायक बाब म्हणजे तब्बल २११ रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी सांगितली.
खासगीत मात्र इंजेक्शनचा काळाबाजार
शासकीय रुग्णालयात रेमडेसिवीर रुग्णांसाठी संजीवनी ठरले, तरी खासगी रुग्णालयात इंजेक्शनचा काळा बाजार झाल्याचे दिसून आले. खासगी रुग्णालयात कोविडचा रुग्ण दाखल होताच त्याच्या नावाने इंजेक्शन खरेदी करून इतर गंभीर रुग्णांना जादा दराने विक्रीचे प्रकार झाले आहेत. यावर अंकुश ठेवण्यासाठी शासनाने रेमडेसिवीर इंजेक्शनचे दर निश्चित केले; मात्र त्याविषयी अनेकांना माहिती नसल्याने अजूनही रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तरच रुग्णाला रेमडेसिवीरची आवश्यकता
कोरोना झाला की रुग्णाला प्रभावी औषध म्हणून रेमडेसिवीर देणे आवश्यक आहे, हा अनेकांचा गैरसमज आहे. डाॅक्टरांच्या मते ज्या कोविड रुग्णांना कोरोनाची कुठलीच लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, अशांना रेमडेसिवीरची आवश्यकता नाही; मात्र रुग्णांच्या फुप्फुसांवर कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्यास त्यावर हे इंजेक्शन प्रभावी ठरू शकते.
रेमडेसिवीर इंजेक्शन हे ॲन्टी व्हायरल डोसचे काम करत असल्याने रुग्णांना दिले जाते. त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले आहेत; परंतु कोरोनाच्या प्रत्येकच रुग्णाला त्याची आवश्यकता नाही. रेमडेसिवीर इंजेक्शन न घेताही अनेक रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला