विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 17:54 IST2020-05-17T17:54:27+5:302020-05-17T17:54:33+5:30
विहिरीमध्ये शिडी आणि झाड सोडण्यात आले होते. त्यांच्या मदतीने बिबट रात्री बाहेर पडले.

विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका
चितलवाडी : तेल्हारा तालुक्यातील चितलवाडी शेतशिवारात पाण्याच्या शोधार्थ फिरत असलेला बिबट एका कोरड्या विहिरीत पडल्याची घटना शनिवार, १६ मे रोजी उघडकीस आली होती. सदर बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागाच्या बचाव पथकाने दिवसभर प्रयत्न केल्यानंतर त्यांना यश आले नाही. अखेर या विहिरीमध्ये शिडी आणि झाड सोडण्यात आले होते. त्यांच्या मदतीने बिबट रात्री बाहेर पडले.
चितलवाडी शेतशिवारात नागोराव पाथ्रीकर यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत शुक्रवारी रात्री दोन ते तीन वर्षाचा एक बिबट पडला होता. नागोराव पाथ्रीकर हे सकाळी शेतात गेले असता, त्यांना विहिरीत बिबट पडल्याचे दिसले. याबाबत त्यांनी पोलीस पाटील यांना दिली होती. पोलीस पाटील यांनी हिवरखेड पोलीस व वन विभागाला याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच हिवरखेड पोलीस व अकोट व परतवाडा वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. सकाळी ९ वाजतपासून बचावकार्य सुरू करण्यात आले होते. दिवसभर बचाव कार्य सुरू होते; मात्र बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले नाही. रात्री वन विभागाने विहिरीत झाड व शिडी टाकली होती. त्यांच्या मदतीने बिबट बाहेर आला.