उमा प्रकल्पासाठी पुनर्वसन प्रस्तावाचे घोंगडे भिजतच

By Admin | Updated: May 7, 2015 01:29 IST2015-05-07T01:29:22+5:302015-05-07T01:29:22+5:30

हजारावर घरांचे पुनर्वसन रखडले

Rehabilitation Proposals for Uma project will start | उमा प्रकल्पासाठी पुनर्वसन प्रस्तावाचे घोंगडे भिजतच

उमा प्रकल्पासाठी पुनर्वसन प्रस्तावाचे घोंगडे भिजतच

संतोष येलकर /अकोला: जिल्ह्यातील उमा बॅरेज प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील बाधित होणार्‍या चार गावांमधील १ हजार ७२ घरांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत दोन वर्षांपूर्वी शासनाकडे सादर करण्यात आला आहे; मात्र मान्यतेअभावी हा प्रस्ताव अद्याप शासन दरबारी अद्याप प्रलंबित आहे. पुनर्वसन प्रस्तावाचे घोंगडे भिजतच पडल्याने, हजारावर घरांच्या पुनर्वसनाचे काम रखडले आहे.
उमा बॅरेज प्रकल्पाच्या कामासाठी बुडीत क्षेत्रातील बाधित होणार्‍या एकूण चार गावांचे पुनर्वसन करावयाचे आहे. त्यामध्ये लंघापूर येथील ३५४ घरांचे व रोहणा येथील १0४ घरांचे सिरसो शिवारात, पोही येथील ५0४ घरांचे माना शिवारात पुनर्वसन करावयाचे असून, माना येथील ७४ घरांचे पुनर्वसन करण्यासाठी जागा ठरविणे अद्याप बाकी आहे. एकूण १ हजार ७२ घरांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागामार्फत ३0 नोव्हेंबर २0१२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सादर करण्यात आलेला हा पुनर्वसनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडून १३ डिसेंबर २0१२ रोजी राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर करण्यात आला होता.
दोन वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावाला अद्याप शासनाकडून मान्यता मिळाली नाही. पुनर्वसनाचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असल्याने, १ हजार ७२ घरांच्या पुनर्वसनाचे काम रखडले आहे. शासनाच्या मान्यतेअभावी पुनर्वसन प्रस्तावाचे घोंगडे भिजतच असल्याने, हजारावर घरांमधील कुटुंबांच्या पुनर्वसनासह उमा प्रकल्पाचे कामही पूर्ण होऊ शकले नाही.

Web Title: Rehabilitation Proposals for Uma project will start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.